नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान! धावपट्टीची चाचणी यशस्वी; नियमित वाहतूक कधी सुरू होणार? # लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान! धावपट्टीची चाचणी यशस्वी; नियमित वाहतूक कधी सुरू होणार?
# लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली
मुंबई :
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज (शुक्रवार, ११ ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पहीली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. नवी मुंबई विमानतळाच्या पूर्णपणे तयार झालेल्या पहिल्या धावपट्टीवर भारतीय वायूदलाचं सी-२९५ हे विमान उतरलं. हे लढाऊ विमान विमानतळ व नवी मुंबईच्या आकाशात काही वेळ घिरट्या घेत होतं. त्यानंतर धावट्टीवर यशस्वीरित्या उतरलं. धावपट्टीच्या बाजूने पाण्याचे फवारे उडवून या विमानाला मानवंदना देखील देण्यात आली. २०२५ पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
विमानतळावरील धावपट्टीची तपासणी करण्यासाठी लँडिंग सर्वाधिक महत्त्वाचं असतं. विमान वेगात उतरणं, धावपट्टीने टायर्स पकडून ठेवणं, रेझिस्टन्स आदी गोष्टी याद्वारे तपासल्या जातात. धावपट्टीची तपासणी करण्यासाठी उतरवलेल्या विमानात इतर चाचण्या करणाऱ्या यंत्रणा असतात.
या विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. सिडको मंडळाला तीन महत्वाचे प्रकल्प आचारसंहितेपूर्वी मार्गी लावायचे होते. या तीन प्रकल्पांमध्ये २६ हजार महागृहनिर्माण प्रकल्पाची सोडत, खालापूर येथील इर्शाळवाडी येथे आदिवासी बांधवांना घरांचे वाटप आणि सर्वात महत्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांच्या चाचण्यांचा समावेश आहे. त्यातील विमातळाच्या धावपट्टीची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. हवाई दलाचं सूखोई विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरलं. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन होते. यासाठी सिडकोने पंतप्रधान कार्यालयाकडे वेळही मागितली होती. परंतु, पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींची वेळ न मिळाल्याने महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
अजून अनेक चाचण्या विमानतळावर यापूढे चालूच राहणार असून या चाचण्यांच्या अहवालानंतर प्रत्यक्षात विमानतळ वापरासंदर्भातील परवानग्यांसाठी हालचाली सूरु होणार आहेत. लहान विमानाने धावपट्टी क्रमांक २६/०८ यावरील उपकरणीय यंत्रातून वैमानिकांना मिळणारी माहिती (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) ची चाचणी सूरु झाली आहे. जुलै महिन्यात अशाच चाचण्यांचे नियोजन केलं होतं. परंतु, मुसळधार पावसामुळे ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती.
विमानतळावरून नियमित वाहतूक सुरू झाल्यानंतर दरवर्षी नऊ कोटी प्रवासी प्रवास करतील : फडणवीस
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार असल्याचे मत यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. या विमानतळावरून ९ कोटी प्रवासी दर वर्षी प्रवास करतील असा दावाही फडणवीसांनी केला होता.
Comments
Post a Comment