धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही.. -- भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर कडाडले
नियमबाह्य पद्धतीने दर्गा तोडण्याची नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांना सय्यद अकबर यांनी घेतले फैलावर
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही..
-- भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर कडाडले
दर्गा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. महाराष्ट्रात अशी शेकडो उदाहरणे आहेत जिथे हिंदू धर्मियांनी प्रथम संदल आणल्याशिवाय दर्ग्यातील उत्सवांना सुरुवात होत नाही. थोडक्यात येथील उत्सवांमध्ये पहिली पूजा करण्याचा मान हा हिंदू धर्मीय बांधवांचा असतो. मिरज येथील हजरत ख्वाजा शमना मिरा बाबा दर्गा, नागपूर मधील ताजुद्दीन बाबा दर्गा, पनवेल परिसरातील तक्का येथे असणारा जमाल शहा बाबा यांचा दर्गा आणि पनवेलच्या टपाल नाका येथे असणारा हजरत अली सिद्धी बादशहा दर्गा ही अशी काही उदाहरणे आहेत जिथे दर्ग्यात उत्सवाच्या वेळेला प्रथम पूजनाचा मान हा हिंदू धर्मियांचा असतो.
मुंबई / प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मौजे चौक येथे सुमारे ३०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून असणारा हजरत सय्यद बालेशहा दर्गा शरीफ तोडण्याची नोटीस नुकतीच पाठवण्यात आली.मीरा भाईंदर चे अप्पर तहसीलदार निलेश गौंड यांनी सदर दर्गा अधिकृत असून तो निष्कासित करण्याबाबत नोटीस पाठवली होती. परंतु अत्यंत पुरातन असणाऱ्या या दर्ग्याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.असे असले तरी नियमबाह्य पद्धतीने दर्गा तोडण्याची नोटीस पाठवून हिंदू आणि मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम सदरच्या नोटीसीने केले.भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा अल्पसंख्यांक मोर्चाचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक संयोजक सय्यद अकबर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनात आणून दिली. तसेच मुस्लिम धर्मीय बांधवांच्या रमझान सारख्या अत्यंत पवित्र महिन्यात असली समाज विघातक कामे का म्हणून करता? असे म्हणत फैलावर घेतले. अखेरीस न्यायालयाकडून निर्णय येईपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही असे आश्वासन गौंड यांनी दिल्यानंतर तूर्तास या वादावर पडदा पडला आहे.
या प्रकरणाबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की मीरा भाईंदर येथील मौजे चौक गांव समुद्रकिनारी असणारा हजरत सय्यद बालेशहा पीर दर्गा शरीफ येथे सुमारे तीनशे वर्षांहून अधिक कालावधीपासून तो अस्तित्वात असल्याचे दस्तावेज उपलब्ध आहेत.वास्तविक सदरचा दर्गा हा पाच ते सात शतके पुरातन असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते.परंतु अचानक पणे अप्पर तहसीलदार गौंड यांनी पाठवलेल्या नोटिसीमुळे येथे नित्यनेमाने धार्मिक विधी करणाऱ्या मुस्लिम आणि हिंदू धर्मीयांच्यात दुःख आणि राग अशी मिश्र प्रतिक्रिया उमटली. दर्ग्याच्या विश्वस्त मंडळांनी समाजसेवक हुसेन सय्यद यांच्या माध्यमातून
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा अल्पसंख्यांक मोर्चाचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक संयोजक सय्यद अकबर यांच्याशी संपर्क साधला.सदर प्रकरणात सय्यद अकबर हेच न्याय मिळवून देतील अशी दर्गा विश्वस्त कमिटीच्या सदस्यांची भावना होती. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सय्यद अकबर यांनी तातडीने ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. यावेळी दर्गा विश्वस्त कमिटीच्या सदस्यांनी देखील आपली कैफियत मांडली. सय्यद अकबर म्हणाले की मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना अत्यंत पवित्रा महिना समजला जातो. या कालखंडात नियमबाह्य पद्धतीने दर्ग्याला नोटीस पाठवणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या नोटिशांमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आणि महत्त्वाचे म्हणजे कुणीतरी कुठल्याही प्रकारची माहिती न घेता केलेल्या तक्रारी वरून प्रशासन जर इतक्या तातडीने दर्ग्यावर कारवाई करायला येत असेल तर मी विचारतो की या मीरा-भाईंदर मध्ये इतके लेडीज बार,धाबे आणि रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि अन्य धनदांडगे व्यावसायिक यांनी अनधिकृत बांधकामे करण्याचा उच्छाद मांडला असताना नोटीशी पाठवणाऱ्या महोदयांना ते अनधिकृत बांधकाम दिसत नाही काय?
अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सय्यद अकबर यांनी अत्यंत अभ्यासूपणे प्रकरणातील तांत्रिक बाजू देखील विशद केली.सदर प्रकरण सन्माननीय न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सन्माननीय न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी अशाप्रकारे नोटीस पाठवणं म्हणजे हा संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराचा केलेला गैरवापर असून तो न्यायालयाचा देखील अवमान आहे. सय्यद अकबर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने युक्तिवाद केल्यामुळे अखेरीस अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मान्य करावे लागले,तसेच न्यायालयाचे निर्देश येईपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही असे आश्वासन द्यावे लागले.
या आश्वासनामुळे हजरत सय्यद बालेशहा पीर दर्गा शरीफ येथे येणाऱ्या मुस्लिम आणि हिंदू बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. दर्ग्याचे मुख्य विश्वस्त माजी नगरसेवक अमजद शेख यांनी सय्यद अकबर यांचे मनापासून आभार मानले. तर यावेळी सय्यद अकबर म्हणाले की प्रकरणातील गांभीर्य लक्षात येताच मी तातडीनेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या सहकार्यामुळेच येथील मुस्लिम आणि हिंदू बांधवांना न्याय देण्यात आम्हाला यश प्राप्त झाले.
साधारणपणे १६ हजाराच्या आसपास मुस्लिम बांधवांची चौक या गावी वस्ती आहे. हजरत सय्यद बालेशहा पीर दर्गा ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या उत्साहात उरुस साजरा केला जातो. दर्गा विश्वस्त कमिटीच्या माध्यमातून दर शुक्रवारी विनामूल्य अन्नदान केले जाते. तसेच गरीब व गरजू मुलांना शिक्षणासाठी भरभरून सहकार्य केले जाते. उच्च शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत देखील दर्गा कमिटी सदस्य करत असतात. याचसोबत समाजातील गरीब व दुर्लक्षित घटकांना वैद्यकीय उपचार व विनामूल्य औषध देण्याचे अत्यंत अतुलनीय कार्य या दर्ग्याच्या माध्यमातून होते. अशा सेवाभावी वृत्तीच्या दर्ग्या विरोधात षडयंत्र करून समाज स्वास्थ्य अस्थिर करणाऱ्या समाजविघातक शक्तींना सय्यद अकबर यांनी चांगलीच चपराक लगावली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सय्यद अकबर यांनी केलेल्या कौतुकास्पद अशा कार्यामुळे येथील तमाम मुस्लिम समाजाचे बांधव येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या व भाजपा पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास विश्वस्तांच्या वतीने प्रकट करण्यात आला.
सय्यद अकबर यांच्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेताना दर्ग्याचे मुख्य विश्वस्त माजी नगरसेवक अमजद शेख, विश्वस्त अब्रार शेख, अफसर खान, अफजल शेख, कलाम खान, वाहिद खान,समन्वयक समाजसेवक हुसेन सय्यद, सय्यद अकबर यांचे निकटवर्तीय बंदा नवाझ मनियार आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment