रु. 65.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या संदर्भात दोन व्यक्तिंना अटक
रु. 65.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या संदर्भात दोन व्यक्तिंना अटक
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने रु. 165.78 कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाची रु. 27.74 कोटीच्या कर महसूलाची हानी करणाऱ्या व्यक्तींना अटक केली आहे.
मे. श्री समस्ता ट्रेडींग प्रा.लि. व शरद क्लिअरिंग ॲण्ड फॉरवरडिंग प्रा.लि. या व्यापाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. सदर कार्यवाहीदरम्यान असे निदर्शनास आले की अनेक बनावट कंपन्यांची स्थापना करून बोगस बिल देण्याचे काम सुरू होते. त्यासंदर्भात वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात धडक मोहीम राबवून त्याअंतर्गत प्रमुख सूत्रधार श्री. राहुल अरविंद व्यास व श्री. विकी अशोक कंसारा यांना दि. 04/10/2023 रोजी अटक करण्यात आली असून महानगर दंडाधिकाऱ्यांनी सदर व्यापाऱ्यांस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदर धडक कार्यवाही श्रीमती प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त अन्वेषण-अ व श्री. संजय सावंत, राज्यकर उपायुक्त अन्वेषण-अ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आनंद गवळी, श्री. संजय सोनावणे, यांनी श्री. रविकांत कांबळे, श्री. राहुल मोहोकर, श्री. गिरीष पाटील, सहायक राज्यकर आयुक्त, अन्वेषण-अ व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांच्यासह संयुक्तपणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. बोगस व्यापार करुन करचुकवेगिरी करणा-या व्यापाऱ्यांमुळे बाजारपेठेतील स्पर्धा नष्ट होऊन सुयोग्य धंदा करु इच्छिणा-या व्यापाऱ्यांना फार मोठया प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांस एक प्रकारे गंभीर इशारा दिलेला आहे.
Comments
Post a Comment