वाशी सेक्टर १७ बसडेपो ते जैन मंदीरासभोवतालच्या परिसरातील वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याचे वाहतुक पोलीसांना आदेश देण्याची एमआयएमची मागणी
वाशी सेक्टर १७ बसडेपो ते जैन मंदीरासभोवतालच्या परिसरातील वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याचे वाहतुक पोलीसांना आदेश देण्याची एमआयएमची मागणी
नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ बसडेपो ते जैन मंदीरासभोवतालच्या परिसरातील वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याचे वाहतुक पोलीसांना आदेश देण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व नवी मुंबई रायगडचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई वाशी सेक्टर १७ परिसर हा वर्दळीचा परिसर आहे. वाशी रेल्वे स्टेशन ते कोपरखैराणे या वाशी बसडेापो मार्गे असलेल्या मार्गावर बाराही महिने सतत वर्दळ असते. वाशी डेपोपासून कोपरखैराणे बाजूला वळाल्यावर जैन मंदीरापर्यत गेल्या दोन अडीच महिन्यापासून रस्त्यावरच वाहन पार्किगचे प्रमाण वाढीस लागले आहे. जवळपास एक ते दोन लेनवर वाहने उभी केलेली असतात. जैन मंदिराच्या दोन्ही बाजूस वाहने उभी असतात. वर्दळीच्या रस्त्यावर मनमानीपणे वाहने उभी असल्याने वाहतुक कोंडी वाढीस लागलेली आहे. विशेष म्हणजे वाशी बसडेपो चौकात तसेच अग्निशमनच्या चौकात वाहतुक पोलीस सतत उभे असतानाही वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. बेकायदेशीररित्या मनमानी उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नाही. या ठिकाणी आपण वाशीतील अग्निशमन दल तसेच विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या समोरील बाजून विरुद्ध दिशेला पाहिल्यास वाशी बसडेपो ते जैन मंदीराच्या दोन्ही बाजूस मनमानीपणे वाहन पॉर्किग केल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे कोपरखैराणे दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. याशिवाय पालिकेच्या वाशी रूग्णालयाकडे जैन मंदीरापासून वळसा मारताना दोन्ही दिशेला वाहने उभी असल्याने रूग्णावाहिकांनाही वाहतुक कोंडीत अडकून पडावे लागते. वाशी डेपो ते जैन मंदिरापर्यतचा दोन्ही बाजूचा परिसरात तातडीने नो पॉर्किगचे फलक लावून त्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या वाहनांवर टोईंग लावून तसेच सतत दंड आकारून कारवाई करण्याचे वाहतुक पोलिसांना आदेश द्यावेत. वाहतुक पोलिसांनी येथे मनमानीपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करून या समस्येचे निवारण न केल्यास एमआयएमच्या वतीने त्याच ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडून समस्येचे गांभिर्य व वाहतुक पोलिसांची उदासिनता जनसामान्यांच्या निदर्शनास आणून देवू . आपण या समस्येचे निवारण तातडीने करण्यासाठी नवी मुंबईच्या वाहतुक पोलिसांना निर्देश देवून ही समस्या संपुष्ठात आणावी आणि या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
Comments
Post a Comment