बावनकुळे हे बोलणे बरे नव्हे
बावनकुळे हे बोलणे बरे नव्हे
पत्रकार बांधवांवर खालच्या पातळीवरील केलेल्या टिप्पणीचा सुदाम पाटील यांच्याकडून जाहीर निषेध
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच पत्रकारांना चहा पाजण्याच्या आणि ढाब्यावर नेण्याच्या वक्तव्यामुळे वादंग स्वतःवर ओढवून घेतला आहे. सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी अशी बेजबाबदार विधाने केल्यामुळे निश्चितच पत्रकारितेचा अपमान झाला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सूचना करताना बावनकुळे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तुमच्या बातम्या छापून आणायच्या असतील तर पत्रकारांना चहा पाजा समजलं काय? त्यांना ढाब्यावर घेऊन जा! या त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सुदाम पाटील म्हणाले की, सत्ता हातामध्ये असो किंवा नसो काँग्रेस पक्षाच्या शिर्षनेतृत्वापासून ते तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान केला आहे. परंतु बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे त्यांचा संपूर्ण पक्ष पत्रकार आणि पत्रकारिते कडे कुठल्या दृष्टीने पाहतो हे स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात वृत्तांकन करणारे कित्येक पत्रकार त्यांचे प्यायचे पाणी सुद्धा स्वतः घेऊन येतात. डेडलाईन आणि ब्रेकिंग न्यूज च्या प्रेशर मुळे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष न देता वेळेत बातमी कव्हर करण्यासाठी आमचे पत्रकार बांधव धावत असतात. मी स्वतः अशा प्रामाणिक स्वाभिमानी आणि सजग पत्रकारांचा सन्मान करतो तसेच असे कित्येक पत्रकार माझे मित्र आहेत. माझ्या पक्षाच्या ध्येयधोरणात काही उणीवा असल्यास,किंवा एखाद्या निवडणुकीत भाजपाने आम्हाला पराभूत केले असल्यास माझे हेच मित्र आमची मैत्री विसरून जी वस्तुस्थिती आहे ती परखडपणे मांडतात.
प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे करावे या मताचा मी आहे. बातम्या छापून आणण्यासाठी बावनकुळे यांनी ज्या खालच्या पातळीवरील वक्तव्य केले आहे त्याचा मी निषेध करतो. एकंदरीतच भारतीय जनता पार्टी पत्रकारांना ज्या पद्धतीने गृहीत धरत आहे ते पाहता त्यांना सत्तेची मग्रुरी चढली असल्याचे चित्र स्पष्ट होते. याच पक्षाच्या पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात एकही पत्रकार परिषद न घेता देशातील तमाम पत्रकार बांधवांचा एक प्रकारे अपमानच केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या येथून पुढील पत्रकार परिषदा धाब्यावरती झाल्या तर मला अजिबात नवल वाटणार नाही.
Comments
Post a Comment