कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी आग्रही
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी आग्रही
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे वेधले.
पनवेल तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत हद्दीतील वाढते नागरिकरण लक्षात घेता कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी डंपिंग ग्राऊंड उपलब्ध नसल्यामुळे मोठया प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले असून तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींनी सिडको प्रशासन, वन विभाग, पंचायत समिती, एमआयडीसी व जिल्हाधिकारी कार्यालयांकडे डंपिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राऊंड उपलब्ध करुन देण्याबाबत किंवा कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न दाखल करण्यात आला होता.
या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, पनवेल तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत हद्दीतील वाढते नागरिकरण लक्षात घेता कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी डंपिंग ग्राऊंड उपलब्ध नसल्यामुळे मोठया प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याची बाब अंशत: खरी आहे. डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे इतरत्र टाकण्यात आलेला कचरा ग्रामपंचायतीकडून नियमितपणे उचलला जात असून स्वच्छतेची काळजी घेण्यात येते. ७१ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींनी सिडको प्रशासन, वन विभाग, पंचायत समिती, एमआयडीसी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डंपिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी केली असल्याची बाब खरी आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व १५ वा वित्त आयोग यामधून कंपोस्ट पीट, प्लास्टिक साठवण युनिट इ. द्वारे कचरा व्यवस्थापनाचे काम करण्यात येत असून पनवेल तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींमधील गावांमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कामे करण्यात येत आहेत. तसेच अन्य काही ग्रामपंचायतींनी सिडको, वन विभाग, एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालयांकडे डंपिंग ग्राउंड करीता जागा मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे.
Comments
Post a Comment