शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पंतप्रधान किसान सुविधा केंद्र- जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी गुरुवारी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पंतप्रधान किसान सुविधा केंद्र- जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी
गुरुवारी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
पनवेल (प्रतिनिधी) शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते.पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे.एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे, आणि या केंद्राचे लोकार्पण देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी २७ जुलै रोजी राजस्थान येथे होणाऱ्या सोहळ्यातून करणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आज पत्रकारांशी संवाद करताना दिली.
त्यांनी पुढे माहिती देताना पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांची उद्दिष्टे सांगितले. यामध्ये शेतक-यांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, किटक नाशके हे एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देणे, शेतक-यांना माती, बियाणे, आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे. किंवा जेथे चाचणी सुविधा उपलब्ध आहे. त्या केंद्रांशी शेतक-यांना जोडून देणे, शेतक-यांना लागणा-या अन्य सेवा विक्री पध्दतीने किंवा कस्टम हायरींग सेंटर द्वारे उपलब्ध करून देणे. शेतक-यांना विविध गोष्टींबाबत माहिती पुरविणे, केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे, खते, औषधे, किटक नाशके यांचा मागणीनुसार पुरवठा होईल, टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे असे असल्याचे नमूद केले. देश भरात जिल्हा, तालुका आणि खेडेगाव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी २ लाख ८० हजार दुकाने आहेत. या खत विक्री दुकानांचे किसान सुविधा केंद्रांमध्ये टप्प्या-टप्प्याने रूपांतर करण्यात येणार आहे. उत्तर रायगड क्षेत्रात असलेल्या पनवेलमध्ये १८, उरणमध्ये ०४, खालापूरमध्ये ११ तर कर्जत तालुक्यात २४ अशी एकूण ५७ केंद्र असल्याचीही त्यांनी माहिती दिली.
शेतीमध्ये करता येवू शकणा-या वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी शेतीमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध झालेले नवे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, पिके, खते, शेतक-यांच्या यशोगाथा याची माहितीही फिल्मद्वारे स्मार्ट टिव्हीतून शेतक-यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असणार आहे. या सर्व सुविधा स्थानिक भाषेत उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर किसान सुविधा केंद्राच्या परिसरातील शेतक-यांना परस्परांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी किसान की बातच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. सद्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्रांचे रूपांतर पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात आले असून उर्वरित ०१ लाख ८० हजार खत विक्री दुकानांचे रूपांतर या वर्षअखेरीस किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिली.
Comments
Post a Comment