रन फॉर एज्युकेशन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन
- Get link
- X
- Other Apps
रन फॉर एज्युकेशन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शन
पनवेल(प्रतिनिधी) शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने जी-२० समिट च्या अंतर्गत रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. त्याला इंग्रजीमध्ये एफएलएन असे म्हटले जाते. याचा पाया जर मजबूत झाला, तर भारतातील शिक्षण व्यवस्था मजबूत होईल हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताला दिलेला आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांनी आज (मंगळवार, दि. २०) खारघर येथे केले.
भारताच्या जी-२० समिट अध्यक्षपदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ विभागांत एफएलएन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक हब असलेल्या खारघरमध्ये मुंबई विभागाच्या 'रन फॉर एज्युकेशन रॅली' चे आयोजन करण्यात आले होते. खारघर सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलपासून सुरू झालेल्या या भव्य रॅलीचे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या रॅलीला शाळा, विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी नगरसेवक नितीन पाटील, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, निलेश बावीस्कर, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शिक्षण विभागाचे विभागीय उप संचालक संतोष सांगवे, मनीषा पवार, रायगड प्राथमिक विभागाच्या अधिकारी पुनीता गुरवरामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, जी-२० समिटच्या आयोजनात शिक्षणाची समिट १७ ते २२ जूनदरम्यान पुणे येथे सुरू आहे. त्यामध्ये २० देशांचे शिक्षणमंत्री सहभागी आहेत. मुलांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी व्यावसायिक शिक्षणाबरोबरच मातृभाषेतून शिक्षण देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यात त्याची अमलबजावणी सुरू असून राज्य शिक्षण क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहिले पाहिजे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. मुलांना श्रमाचे महत्त्व कळावे यासाठी स्काऊट आणि गाईड हा विषय पुढील वर्षापासून पहिलीपासून सक्तीचा करण्यात येणार आहे. शेतीप्रधान देश आणि राज्य असल्याने अन्नधान्य नसेल तर आपण जगू शकणार नाही याची जाणीव मुलांना व्हावी तसेच त्यांनी शेतकर्याला सन्मान द्यावा यासाठी कृषी विषयही सक्तीचा केला आहे. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानात मुलांनी सहभागी झाले पाहिजे. राष्ट्र मजबूत बनविण्यासाठी मुलांना परिपूर्ण बनवले जाणार आहे. त्यांना युरोपमध्ये वापरल्या जाणार्या भाषेचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ते जगात कोठेही जाऊ शकतील याची शासन काळजी घेत आहे. इंग्रजी ही संपर्काची भाषा असल्याने शिकलीच पाहिजे, पण स्वत:च्या भाषेत मूल शिकले तर ते अधिक हुशार होऊ शकते. म्हणूनच ग्रामीण भागातील मुलांना मातृभाषेत इंजिनियरिंग व मेडिकलचे शिक्षण देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकांना सेवा देऊन त्यांचे मन जिंकायचे व सर्व विश्व हे आपले कुटूंब आहे ही संकल्पना पहिल्यांदाच जी-२० परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जगात जात आहे. त्याबद्दल जग मोदीसाहेबांचे स्वागत करीत आहे. शिक्षण समिट घेण्याचा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री अन्नपूर्णा देवींचे आभार मानतो, असेही मंत्री केसरकर यांनी म्हटले.
रामशेठ ठाकूर लोकनेते आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले आहे. ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या शिक्षणाचा लाभ दिला आहे. त्यामुळे सध्या सेमी अर्बन असलेल्या, पण पुढील काळात आर्थिक हब बनू शकणार्या पनवेलमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे. आमदार प्रशांत ठाकूर कार्यतत्परतेने काम करीत आहे, असे अधोरेखित करतानाच पनवेलमध्ये उभे राहणारे विमानतळ, नवीन ट्रान्स हार्बर ब्रिज, नवीन मेट्रो व नवीन बोगदा, अशी प्रकल्प संक्रात असताना पुढच्या काळात सिडको या ठिकाणी एक हब निर्माण करीत आहे, जे फायनान्शियल हब असेल, इंडस्ट्रियल हब असेल. त्या निमित्ताने पनवेल हे नवी मुंबईच्या जोडीने एक मोठे शहर म्हणून विकसित होईल. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर व त्यांचे कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काम करत असतात, त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होत असताना खारघर हे शैक्षणिक हब म्हणून भारतात निश्चितपणे उभे राहिल, अशी खात्री मंत्री केसरकर यांनी व्यक्त केली
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, अन्न, पाणी आणि निवारा नंतर शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे असते. शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना मला नेहमीच शिक्षण विभागाचे सहकार्य मिळत असल्याने जास्तीत जास्त शैक्षणिक काम करीत राहावे असे वाटते.
चौकट- जी-२० समिट च्या अनुषंगाने लोक सहभागातून हा कार्यक्रम कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली “वसुधैव कुटुंबकम” या ब्रीदवाक्यास अनुसरून Foundational Literacy & Numeracy (FLN) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी ठेवून या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, संपू र्ण समुदाय आणि लोकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल येथून या रॅलीला सुरुवात झाली. पुढे विश्वज्योत सजल, ग्रीन हेरिटेज बिल्डिंग, जलवायू विहार बस स्टॉप, शिल्प चौक, बँक ऑफ बरोडा, इंडियन ऑइल पेट्रोल पंप, बिकानेर स्वीट्स, त्यानंतर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत विविध शाळेतील दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयी विविध फलक संदेशाद्वारे जनजागृती करण्यात आली.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment