रोजच्या आहारात भरड धान्य समाविष्ट करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी* *--उपविभागीय अधिकारी अमित शेडगे*
रोजच्या आहारात भरड धान्य समाविष्ट करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी - उपविभागीय अधिकारी अमित शेडगे
प्रतिनिधी /संदीप लाड
:- आहारातील भरड धान्यांचा वापर कमी झाल्याने प्रत्येक कुटूंबास विविध आजारांचा सामना करावा लागत असून रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी राजगिरा या सारख्या तृणधान्यांचा (भरड धान्य) वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी आज श्रीवर्धन येथे केले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे व राज्य शासनाचे विविध विभाग तसेच नगरपरिषद श्रीवर्धन यांच्या सहकार्याने श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर येथे आंतरराष्ट्रीय भरड धान्य (पौष्टिक तृणधान्य) वर्ष 2023 निमित्त आयोजित मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तहसिलदार महेंद्र वाकळेकर, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, नगर परिषद मुख्याधिकारी विराज लबडे, , तालुका कृषी अधिकारी डी.एल. कुंभार, बालविकास सेवा अधिकारी श्रीमती अमिता भायदे, म्हसळा तहसिलदार समीर घारे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी.कुमार, तालुका क्रीडा समन्वयक विजय मरखेंडे व राजेंद्र ठाकूर तसेच माजी नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी अमित शेडगे म्हणाले की, श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यास हजारो पर्यटक भेटी देत असतात. स्थानिक व्यवसायिकांनी भरड धान्यांचे आरोग्यातील महत्व याविषयी प्रचार व प्रसार करुन भरड धान्यांच्या पदार्थांची विक्री करावी, भोजनालयांमध्ये भरड धान्यांचा आहारात समावेश करावा व आपल्या व्यवसायाला बळकटी द्यावी.
या प्रदर्शनानिमित्त राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने स्टाल्स लावून शासनांच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. श्रीवर्धन एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रोजच्या आहारात भरड धान्यांच्या 40 पेक्षा अधिक विविध पाककला पदार्थांचे सादरीकरण करुन पाक कलेची सविस्तर माहिती दिली. पंचायत समितीच्या बचतगटांनी तृणधान्यांपासून तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाद्वारे भरड धान्याचा माहिती स्टाल्स उभारला आहे. श्रीवर्धन नगर परिषदेद्वारे स्टॉल लावून स्वच्छता प्रचार, सेंद्रीय खत, मोफत कापडी पिशव्यांचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या प्रदर्शनात विविध भरड धान्यांची माहिती, या धान्यांच्या आहारांचे आरोग्यातील महत्व, या धान्यांमध्ये असलेली पौष्टिक तत्व, या धान्यांचे उत्पादन तसेच या धान्यांपासून बनविण्यात आलेले पौष्टिक पदार्थ यांची माहिती मल्टीमिडीया चित्र प्रदर्शन तसेच एलईडी स्क्रीनच्या माध्यामातून देण्यात येत आहे. भरड धान्यांचा प्रचार करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच युवकांमध्ये या धान्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन आहारातील पौष्टिक तृणधान्याच्या महत्वाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी या मल्टिमीडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे. मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवणारे अन्न म्हणून या धान्यांकडे बघितले जाते. या तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी,नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटके,सावा, कूट्टु व राजगिरा या दहा धान्यांचा समावेश होतो. या भरडधान्यांना “सुपरफूड” असेही म्हटले जाते.
हे प्रदर्शन दि. 19 ते 21 मे,2023 दरम्यान सर्वांसाठी मोफत खुले असून या प्रदर्शनास सर्व नागरिक तसेच पर्यटकांनी भेटी द्याव्यात, असे आवाहन केंद्र व राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment