आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रत शेतमजूर संघटनेच्या संघर्षाला यश # प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनी व्यवस्थापनाचे आश्वासन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रत शेतमजूर संघटनेच्या संघर्षाला यश
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनी व्यवस्थापनाचे आश्वासन
रेवदंडा( प्रतिनिधी) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटेनेच्या संघर्षाला यश आले असून जिल्हाधिकार्यांसमवेत कंपनी प्रशासन व उसर शेतमजूर संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिले असल्याची माहिती उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुरेश धसाडे यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनी परिसरात नव्याने पॉलीमर कंपनी प्रस्तावित आहे. या कंपनीच्या विरोधात स्थानिक शेतमजूर संघटनेने प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्त उसर शेतमजूर संघटनेस न्याय मिळवून देण्याचा शब्द नाईक कुणे येथील सभेत दिला होता. या संदर्भात त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदनही दिले होते. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात 27 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी प्रांताधिकारी, पुनवर्सन अधिकारी, गेल प्रबंधक एचओडी सक्सेना, प्रोजेक्ट जनरल मॅनेजर लोखंडे, अधिकारी एस. एस. म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीपशेठ भोईर, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्यासह उसर शेतमजूर संघटनेचे निलेश गायकर, नरेश ठाकूर, दत्तात्रेय ठाकूर, सुरेश धसाडे, अनंत शिंदे, निखिल पाटील आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.
या सभेत प्रकल्पग्रस्त शेजमजूर संघटनेच्या मागण्या कंपनी व्यवस्थापनाकडे ठेवण्यात आल्या. त्यापैकी प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेणे, स्थानिकांना प्रथम प्राधान्य, स्थानिकांकडे असलेल्या मालवाहतूक ट्रक, डम्परला सामान मटेरियल सप्लाय देणे, सध्या सुरू असलेल्या प्रत्येक कॉन्ट्रक्टमध्ये स्थानिकांची नेमणूक करणे, प्रकल्पबाधित गावांना एमआयडीसीचे पाणी अल्पदरात उपलब्ध करून देणे, सर्व प्रकल्पबाधित गावांना गेल कंपनीच्या लाईनवरून वीजजोडणी करून देणे आदी महत्त्वाच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होऊन त्यांची पूर्तता येत्या दोन महिन्यांत करण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आमदार प्रशांत ठाकूर व शासनाचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment