सीकेटी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधान मंडळ प्रत्यक्षण भेट
सीकेटी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधान मंडळ प्रत्यक्षण भेट
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले मार्गदर्शन
पनवेल(हरेश साठे) तरुणांचे राष्ट्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बहुविध बिरुदे असणाऱ्या देशातील तरुणांमध्ये संसदीय लोकशाहीच्या मूल्यांचे रोपण करण्यासाठी तथा राज्यविधिमंडळाच्या विधीनिर्मिती प्रक्रियेबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (स्वायत्त) च्या राज्यशास्त्र विभागातील ४७ विद्यार्थी आणि ०२ प्राध्यापक यांच्या चमूने सोमवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला भेट दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ताफा दुपारी ०३ वाजता विधानमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री. रवींद्र चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी विद्यार्थ्यांनी काही वेळ विश्रांती व अल्पोपहार घेतल्यानंतर दुपारी ठीक ०३:४५ वाजता विधानभवनाच्या परिसरात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सर्वप्रथम विधिमंडळाच्या कनिष्ठ सभाग्रुहाचे (विधानसभा) कामकाज पाहण्यासाठी विद्यार्थी दाखल झाले. यावेळी सभागृहात पुरवठा मागण्यांवर चर्चा सुरु होती.
विधानसभेचे कामकाज पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांचा चमू विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृह (विधानपरिषद) कडे मार्गस्थ झाले. यावेळी सभागृहात शेतकऱ्यांच्या समस्या, नुकसान भरपाई, नाफेडच्या माध्यमातून प्रलंबित कृषी उत्पादन खरेदी याबाबतची चर्चा निष्कर्षाकडे आल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री मा.अब्दुल सत्तारांनी चर्चेस उत्तर दिले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती मा.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज चालले होते. दोन्ही सभागृहाचे कामकाज पार पडल्यानंतर महाविद्यालयाच्या चमूस पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून त्यांना देशाच्या राजकीय प्रक्रियेत सक्रीय सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेस यशस्वी करण्याबाबत भाष्य केले. याबरोबर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांच्या विद्यार्थी दशेतील अनुभव उधृत केले. याबरोबर महाविद्यालयातील तरुणांनी विधानमंडळाच्या कामकाज समजून घेणे महत्वाचे असल्याचे भाष्य केले. विधानभवन परिसरास भेट देण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना प्रस्तुत वास्तूचं, कार्यपद्धतीचे ज्ञान मिळावे याकरिता विधानभवनाने एक चित्रफित तयार करून त्याचे सादरीकरण करण्याबाबत प्रतिपादन केले. यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या चमू सोबत मुक्त संवाद केला व अश्या प्रकारच्या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या सातत्यपूर्ण आयोजनाबाबत शुभेच्छा दिल्या. सदर भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.आकाश पाटील, प्रा.अपूर्वा ढगे, यांनी विशेष परिश्रम घेतले. यासोबतच आयोजनातील महत्वपूर्ण तांत्रिक व प्रशासकीय बाबींच्या पूर्ततेसाठी विधानभवन हेड क्लार्क प्रवीण देवरे, उमेश पोद्दार यांचे विशेष सहकार्य लाभले.
विधिमंडळ भेटीआधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यविधिमंडळाच्या कार्यवाही बाबतचे महत्व विशद केले. याबरोबरच विधानभवन परिसरातील घडणाऱ्या सर्व बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे अवलोकन करण्याबाबत भाष्य केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षण भेटीस शुभेच्छा देण्याकरिता महाविद्यालयाचे आय.क़्यु.ए.सी. समन्वयक प्रो.डॉ.बी.डी.आघाव, परीक्षा नियंत्रक डॉ.एस.आय.उन्हाळे, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.डी.एस.नारखेडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment