राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२; रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पटकाविले महाराष्ट्रात अव्वल स्थान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन
- Get link
- X
- Other Apps
राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२; रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पटकाविले महाराष्ट्रात अव्वल स्थान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन
पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ पटकाविला आहे. त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबई मधील एकमेव विद्यालय ठरले आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी राज्यातील ९३. ९८ शाळांनी सहभाग घेतला होता. त्याचे मूल्यमापन करून जिल्ह्यांनी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रतिजिल्हा १४ शाळांचे नामांकन केले होते. त्यानुसार शाळांचे राज्यस्तरीय मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये ग्रामीण प्राथमिक व माध्यमिक आणि शहरी प्राथमिक, माध्यमिक तसेच उपश्रेणी असे विभाग होते. त्या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण मंत्रालयाकडून स्वच्छ विद्यालयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये शहरी भागातील माध्यमिक शाळांमध्ये खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने "फाइव्ह स्टार रेटिंग" सह "प्रथम क्रमांक" पटकावला आहे. त्यामुळे शिक्षणासह, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनिय कार्य करणाऱ्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, त्याचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच राज्यातून एकूण २६ शाळांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे, त्यामध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचाही समावेश झाला आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने मिळवलेल्या या बहुमानाबद्दल शाळेच्या प्राचार्या राज अलोनी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment