विमानतळाला दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडू देणार नाही- आंदोलनात दुमदुमला गजर 

 

विमानतळाला दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडू देणार नाही- आंदोलनात दुमदुमला गजर 

दिबांच्या स्मृतिदिनी लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समिती, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचा उसळला जनसागर

आता लढाई आरपारची करायची- लोकनेते रामशेठ ठाकूर 
दिबांचे नाव ही केवळ मागणी नसून भूमीपुत्रांचा अट्टाहास आहे - आमदार गणेश नाईक
भूगोल बदलेल पण इतिहास बदलणार नाही- दशरथ पाटील 

पनवेल(हरेश साठे) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही, असा जोरदार गजर सिडको घेराव आंदोलनात सीबीडी बेलापूर येथे झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समिती, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचा  जनसागर उसळला होता. 
        नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी आज शुक्रवार दिनांक २४ जून रोजी सिडको विरोधात घेराव आंदोलन झाले.   साडेबारा टक्क्यांचा कायदा दिबा पाटील यांच्यामुळेच अस्तित्वात आला. त्यामुळे एकवेळ भूगोल बदलेल पण इतिहास बदलणार नाही. अशी जोरदार गर्जना करत दिबासाहेबांचा जयजयकार संपूर्ण आसमंतात दुमदुमला होता. घेराव आंदोलन म्हणजे असंतोषाची एक ठिणगी होती त्याचा वणवा होण्याआधी सिडको व राज्य सरकारने भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे. 'दिबां'चे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाकडून सांगण्यात आले.
        बेलापूर सीबीडी  येथील क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स येथून सकाळी साडेदहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर हे भूमिपुत्रांचे वादळ सिडको भवनाजवळ धडकले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, पनवेल महापौर कविता चौतमोल, भारतीताई पोवार, उपमहापौर सीता पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, ओबीसी नेते राजाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत,  दशरथ भगत, नंदराज मुंगाजी, जगदीश गायकवाड, संतोष केणे, गुलाबराव वझे, वाय. टी.  देशमुख, जे डी तांडेल, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, रामचंद्र घरत, अर्जुन चौधरी, डॉ. राजेश पाटील, मनोहर पाटील, राजेश गायकर, विनोद म्हात्रे,  सीमा घरत, नेत्रा शिर्के, यांच्यासह आदी लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक-नगरसेविका, सर्वपक्षीय समित्या, भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे शिक्षण, नोकरी, साडेबारा टक्के भूखंड, गरजेपोटी बांधलेली बांधकामे, गावठाण विस्तार, विमानतळबाधीत २७ गावाच्या समस्या, यापूर्वी सिडकोत अनेक ठराव होऊनही प्रकल्पग्रस्तांचे गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जात नाहीत. यासाठी नुकताच केलेल्या शासन निर्णयात २५० मीटरचे निकष, भाडेपट्टा अश्या अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत.  सिडकोच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी व मागण्या मान्य करून घेण्यासाठी आज हे आंदोलन महत्वाची भूमिका बजावणारे असणार आहे. या आंदोलनाचे प्रास्ताविक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून आजपर्यंतच्या लढाईची माहिती देत, दिबांच्या नावाचा जयजयकार केला. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांनी मागील वर्षी १० जूनला भव्य साखळी आंदोलन, २४ जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्च भुमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनाचा काळादिन आंदोलन, २४ जानेवारीचे विमानतळ काम बंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली. त्यानंतर आजही आंदोलनाची धार तेज करत सिडकोच्या उरात धडकी भरण्यात आली. यावेळी आगरी कोळी भाषेतील दिबांवर आधारित गाणी गाऊन गायक जगदीश पाटील यांनी आंदोलनात आणखी उत्साह आणला होता. 

कोट- 
दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांना नोकरी, रोजगार, गावठाण विस्तार, व इतर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी लढाई उभारली आहे.  गेल्या वर्षी याच दिवशी विमानतळाला दिबांच्या नावासाठी सिडकोला घेराव घातला होता. तर मधल्या कालावधीमध्ये सुद्धा प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कृती समिती संघर्ष करीत आहे. जोपर्यंत विमानतळाला दिबासाहेबांचे नाव दिले जात नाही आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटत नाही तोपर्यंत संघर्ष अटळ आहे. आता लढाई आरपारची करायची आहे. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या सोडवल्याशिवाय कृती समिती स्वस्थ बसणार नाही. सिडको एमडी आज आजारी आहेत असा निरोप आला. परंतु ते खरोखरच आजारी आहेत की आंदोलनाच्या धास्तीने आजारी पडले आहेत याची कल्पना नाही. परंतु अजून किती दिवस आजारी राहतील? दिबांच्या नावासाठी आग्रही राहणार आहोत. - माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष-लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती

कोट- 
लोकांच्या घरांची कामे आणि लोकांच्या नोकरीची कामे सरकारने केली पाहिजे. एका सीमित कालखंडानंतर सरकार हे लोकांचे होते. अश्यावेळी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मालकी हक्काची घरे मिळायला हवी. ज्या लोकांनी गरजेपोटी दुकाने किंवा घरे बांधली असतील त्यांची घरे आता अधिकृत करून दिली पाहिजेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम चालू राहतील यासाठी सगळे नेते एकत्र आले आहेत. धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन लढा सुरू झाला आहे आणि हा यशस्वी होणार याची खात्री आहे. विमानतळाला दिबांचे नाव ही केवळ मागणी नसून भूमीपुत्रांचा अट्टाहास आहे. - आमदार गणेश नाईक, माजी मंत्री

कोट- साडेबारा टक्क्यांचा कायदा दिबासाहेबांमुळे अस्तित्वात आला. त्यांनी सर्व समाजासाठी आपले आयुष्य अर्पण केले. भूमिपुत्रांचे दैवत दिबांमुळे आपण सर्व भूमिपुत्र एकसंघ झालो आहोत. त्यांनी आपल्या कार्यातून इतिहास घडविला आहे. त्यामुळे भूगोल बदलेल पण इतिहास बदलणार नाही. इतिहास घडविणारे दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांचे सर्व मागण्या सुटेपर्यंत हि लढाई कायम राहणार. - दशरथ पाटील, अध्यक्ष- लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती


कोट-       दि बा पाटील होणे सोपे नाही एक बाजूला कुबेर असताना त्यांनी जनता निवडली आणि जनतेसाठी लढत राहिले. मंडळ आयोगाची मागणी त्यांच्यामुळे पूर्ण झाली. गाव तेथे शाळा, घर तेथे काम हे दिबांनी उद्दिष्ट्ये ठेवले. ते सर्व समाजाचे नेते होते. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला मिळालाच पाहिजे. - भारती पोवार - १९८४ सालच्या लढ्यातील कार्यकर्त्या 


कोट-  ज्या सरकारने नाव देण्याचे अमान्य केले त्या सरकारविरोधात उद्यापासून न्यायालयीन लढाई सुरु होणार आहे. - राजाराम पाटील, ओबीसी नेते 

कोट- जो पर्यत दिबासाहेबांच्या नावाचे विमान उडत नाही तो पर्यंत लढाई सुरूच राहणार आहे. मला एकदा तडीपार केले, पण दिबासाहेबांच्यासाठी दुसऱ्यांदा झालो तरी चालेल. विमानतळात ९५ गावातील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. बडबड नाही तर कृती करण्याचे काम समिती करीत आहे. - जगदीश गायकवाड - माजी महापौर पनवेल महानगरपालिका 

कोट- प्रकल्पग्रस्तांना भाडेपट्ट्यावर राहण्याचे कुटील डाव सिडकोने आखला आहे. तो या लढ्यातून हाणून पाडायचा आहे. दिबासाहेबांचे नाव लागल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. 
                              - आमदार मंदा म्हात्रे 

कोट-
भगवान के घर देर है अंधेर नही काळ जवळ आला आहे आणि सिडकोने केलेला ठराव नक्की विखंडित होईल. राज्य सरकारकडून प्रस्ताव गेल्यांनतर केंद्र सरकार गांभीर्याने लक्ष देईल. - माजी मंत्री जगन्नाथ पाटील 

कोट- मागील वर्षी दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठका झाल्या पण त्यांनी जनतेच्या भावना जाणल्या नाहीत. ज्या राजाने जनेतच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत त्याची आता काय अवस्था झाली आहे. - कॉम्रेड भूषण पाटील 








Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर