मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी - आमदार प्रशांत ठाकूर
मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल(प्रतिनिधी) केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात भापच्यावतीने आज (दि. १२) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, गौरव कांडपिळे, सुहासिनी केकाणे, अभिषेक भोपी, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल - डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे , अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही. यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते, असेच सिद्ध होते. भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील २२ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत देऊन मोठा दिलासा दिला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सरकारनेही जबाबदारीने वागत आपल्या करात कपात करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment