दहशतवाद्याचं घर खरेदी केल्याचा 'तो' आरोप; नवाब मलिक म्हणाले...
दहशतवाद्याचं घर खरेदी केल्याचा 'तो' आरोप; नवाब मलिक म्हणाले...
मुंबई: मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी अंडरवर्ल्डंशी संबंधित व्यक्तींकडून कुर्ला एलबीएस रोड येथे ३ एकर जमीन कवडीमोल भावाने घेतल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याचवेळी मलिक यांच्या अन्य चार मालमत्तांचा उल्लेखही फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांचे हे सारे आरोप फेटाळताना मलिक यांनी आपली बाजू माध्यमांपुढे ठेवली आहे. यात वांद्रे येथील एका प्लॅटची माहितीही मलिक यांनी दिली आहे.
कुर्ला एलबीएस रोड येथील जागेबाबत फडणवीस यांनी जी माहिती दिली आहे ती अर्धवट आणि अर्धसत्य आहे. जमिनीचा जो काही व्यवहार झाला आहे तो कायदेशीर प्रक्रियेनुसारच झालेला आहे. फडणवीस राईचा पर्वत करून सारं काही सांगत आहेत. त्याची खुशाल चौकशी करा. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी मलिक यांच्या इतर चार मालमत्तांचा उल्लेख केला आहे. या मालमत्ता कोणत्या, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता मलिक यांनी वांद्रे येथील एका घराबाबत माहिती दिली.
वांद्रे येथे मलिक यांच्या मुलाने दहशतवाद्याकडून घर खरेदी केले, असा आरोप झाला होता. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. मलिक म्हणाले,' माझ्या मुलाने वांद्रे येथे साडेचार कोटी रुपय मोजून घर खरेदी केले होते. दहाबारा वर्षापूर्वीचा हा व्यवहार आहे. स्टँपड्युटी भरण्यासह सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून हे घर आम्ही घेतले होते. नावेद मोहम्मद अली व त्याची बहीण जी बँकेत आहे या दोघांशी हा व्यवहार झाला होता. त्यांनी घर विकलं आणि आम्ही ते विकत घेतलं इतका सरळ हा व्यवहार आहे. तरीही तेव्हा आमच्यावर आरोप झाला होता. मोहम्मद अली खान हा दहशतवादी आहे आणि त्याच्याकडून मलिक यांच्या मुलाने घर खरेदी केलं असं बोललं जात होतं पण यात तथ्य नाही. आमचा व्यवहार मोहम्मद अलीशी नाही तर त्याच्या मुलांशी झाला होता', असे मलिक यांनी नमूद केले. मोहम्मद अली खान याच्यावर खूनाचा आरोप होता. नंतर याप्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली होती. आता तो हयात नाही, असेही मलिक यांनी नमूद केले.
Comments
Post a Comment