मोबाईल फोन खेचुन पळणार्याला पोलिसांनी घेतले ताब्यात # रिक्षासह मोटारसायकलीची चोरी # तळोजा पोलिस करणार जप्त ट्रॉल्यांचा लिलाव
मोबाईल फोन खेचुन पळणार्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
पनवेल (वार्ताहर): पतीसह रस्त्याने पायी चालत जाणार्या विवाहितेच्या हातातील मोबाईल खेचुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेले दोघे तरुण मोटारसायकल स्लिप होऊन खाली पडल्याने सदर दाम्पत्याने एका अल्पवयीन तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना खांदा वसाहत भागात घडली. खांदेश्वर पोलिसांनी या अल्पवयीन तरुणावर व त्याच्या
साथिदारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच पळुन गेलेल्या त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला आहे. या घटनेतील तक्रारदार अमोल कोरे (31) हा खांदा वसाहत सेक्टर-12 मध्ये राहाण्यास असून जेवण केल्यानंतर तो आपल्या पत्नीसह शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडला होता. यावेळी कोरे याची पत्नी चालत जातानाच मोबाईलवर बोलत होती. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने कोरे याच्या पत्नीच्या हातातील मोबाईल फोन खेचला. त्यानंतर दोघेही भरधाव वेगात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची मोटारसायकल स्लिप होऊन दोघेही मोटारसायकलसह खाली पडले. यावेळी मोबाईल खेचणारा तरुण संधी साधून पळून गेला, मात्र मोटारसायकल चालविणार्या अल्पवयीन तरुण कोरे दाम्पत्याच्या हाती लागला. त्यामुळे कोरे दाम्पत्याने त्याला पकडून खांदेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार पोलिसांनी सदर अल्पवयीन तरुणाला जबरी चोरीच्या गुह्याखाली ताब्यात घेऊन पळुन गेलेल्या त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला आहे. या अल्पवयीन तरुणाला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बालाजी पावणे यांनी दिली. या घटनेत अल्पवयीन तरुण कळंबोली भागात राहण्यास असुन सध्या तो बारावीचे शिक्षण घेत आहे. त्याने आपल्या शेजार्यांची मोटारसायकल चालविण्यासाठी घेऊन हा गुन्हा केल्याचे तपासात आढळुन आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
रिक्षासह मोटारसायकलीची चोरी
पनवेल (संजय कदम)-
पनवेल परिसरातून रिक्षासह मोटारसायकलीची चोरी झाल्याची घटना घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.
शहरातील लाईन आळी येथील भवानी मोबाईल एस्केसरीजसमोर सुनिल पाटील यांनी त्यांची काळ्या पिवळ्या रंगाची ऑटोरिक्षा क्र.-एमएच46एझेड4890 ज्याची किंमत 45 हजार इतकी आहे. ही उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर रिक्षा चोरून नेली आहे. तर दुसऱ्या घटनेत करंजाडे प्लॉट नं-03 मंगलमूर्ती कंस्ट्रक्शनच्या कार्यालयासमोर विजय दरेकर यांनी त्यांची 35 हजारांची काळ्या रंगाची होंडा कंपनीची सीबी युनिकॉर्न गाडी क्र- एमएच46एस9679 हि उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडीचोरून नेली आहे. याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
तळोजा पोलिस करणार जप्त ट्रॉल्यांचा लिलाव
पनवेल (संजय कदम)
चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या 4 ट्रॉल्यांची ओळखपत्रे मूळ मालकाने तळोजा पोलिस ठाण्यात आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सदर ट्रॉल्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
तळोजा पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात एकूण चार ट्रॉल्या जप्त करण्यात आलेल्या होत्या. सदर ट्रॉल्यांचे मूळ मालकांचा शोध घेतला असता परंतु ते मिळून येत नाही. सदरच्या ट्रॉल्या तळोजा पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. त्यांचे मूळ मालक मिळून येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रीया केली जाणार आहे. दि.24.06.2021 रोजी हि लिलाव प्रक्रिया होणार असून त्यासाठी इच्छूकांनी तत्पूर्वी तळोजा पोलिस ठाण्याचा दुरध्वनी क्र.-02227412333 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय नाळे यांनी केली आहे.
टाटा कंपनीच्या ट्रेलरमधील मालासह अपहार करणार्या त्रिकुटास तळोजा पोलिसांनी केले 24 तासात गजाआड
पनवेल, (संजय कदम) ः
टाटा कंपनीच्या ट्रेलरमधील मालासह अपहार करणार्या त्रिकुटास तळोजा पोलिसांनी अवघ्या 24 तासात ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीचा पूर्ण माल हस्तगत केला आहे.
तळोजा पोलीस ठाणे गु. र. नं. 176/2021 भादवि कलम 379 या गुन्हयातील फिर्यादी ओमप्रकाश जितेंद्र यादव, वय- 37 वर्षे, धंदा- चालक, रा. अजिंक्य म्हात्रे यांची चाळ, समर्थ नगर, रामवडी, ता. पेण, जि. रायगड यांनी त्यांचे ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर हा मला सह मुंब्रा पनवेल रोड वर, एल अॅण्ड टी कंपनी समोर पार्क करून ठेवला असता तो कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला म्हणुन पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्याने तात्काळ वपोनि काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि संजय नाळे यांच्यासह सपोनि निकम, पोलीस हवालदार वैभव शिंदे, पोलीस नाईक सचिन पवार, पोलीस नाईक दुर्वास पाटील, पोलीस नाईक अभिजीत दगडे, पोलीस शिपाई महेंद्र गायकवाड यांनी गुप्त बातमीदार व इतर तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता मुंबई नाशिक हायवे लागत भिवंडी येथील सोनाले गावा जवळ सदर ट्रेलर पार्क करून ठेवला असताना मिळून आला. त्यानुसार या पथकाने सापळा रचून सोपान एकनाथ पाटील, वय- 34 वर्ष, रा. सरवली पाडा, पो. सरवली एम.आय.डी. सी, ता. भिवंडी, जि. ठाणे, जिशान खान, इरफान खान यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीच्या ट्रेलरसह मुद्देमाल असा मिळून जवळपास 45 लाखाच्या आसपास हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुधीर निकम करीत आहेत.
ई-मेल आयडी हॅक करुन महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन नातेवाईकांना पाठविले अश्लिल मेसेज, नवी मुंबई सायबर सेलकडून तपासाला सुरुवात
पनवेल : - सायबर चोरट्यांनी खारघर भागात राहणाऱया एका महिलेचे व तिच्या मुलाचे ईमेल आयडी हॅक करुन त्याद्वारे सदर महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन त्यांच्या ओळखीतील मित्र-मैत्रीण व नातेवाईकांना अश्लिल मेसेज तसेच शिवीगाळ असलेले मेसेज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. सदर महिलने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर चोरटयावर गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिला आपल्या दोन मुलांसह खारघर येथील बेलपाडा भागात राहाण्यास आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या त्यांच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरु असल्याने त्यांच्या क्लासेससाठी त्या आपल्या ई-मेल आयडीचा वापर करत होत्या. तर त्यांचा मुलगा देखील स्वत:च्या नावाने तयार केलेल्या ई-मेल आयडीचा वापर ऑनलाईन क्लासेससाठी करत होता. या महिलेचे दोन्ही मुले मागील वर्षभर लॅपटॉप व कॉम्फ्यु्टरवर ई-मेलआयडीचा वापर करुन ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. मात्र अज्ञात सायबर चोरटÎांनी गत एप्रिल महिन्यामध्ये या महिलेचे व तिच्या मुलाचे ई-मेल आयडी हॅक करुन त्याच्या माध्यमातून नेटवर्कमध्ये फेरफार केला. तसेच त्याचा गैरवापर करुन सदर महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन त्यांच्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांना अश्लिल व शिवीगाळ असलेले मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे नातेवाईक व मित्र मैत्रिणींनी या महिलेला संपर्क साधून याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी त्यातील एक सुद्धा मेसेज पाठविले नसताना, परस्पर त्यांच्या व्हॉट्सऍपवरुन मेसेजेस पाठविण्यात आल्याने त्यांनी याबाबत अधीक माहिती घेतली असता, त्यांचे व त्यांच्या मुलाचे ईमेल आयडी हॅक करुन इंटरनेटचा वापर करुन सदर मेसेज पाठवण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर सेलने केलेल्या प्राथमिक तपासात सदर महिलेचा व त्यांच्या मुलाचा ईमेल आयडी हॅक करण्यात आल्याचे तीन व्यक्तींनी सदर महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन त्यांच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणींना अश्लिल व शिवीगाळ असलेले मेसेज पाठविल्याचे आढळुन आले. त्यानुसार सायबर सेलने या प्रकरणात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
Comments
Post a Comment