मालमत्ता कर अभय योजना जाहीर झाल्याने नागरिकांनी मानले परेश ठाकूर यांचे आभार
मालमत्ता कर अभय योजना जाहीर झाल्याने नागरिकांनी मानले परेश ठाकूर यांचे आभार
पनवेल(प्रतिनिधी) सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मागणी केल्याप्रमाणे पनवेल शहरातील पूर्वाश्रमित नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली आहे. पनवेल शहरातील ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे त्यांच्यासाठी ही मालमत्ता कर अभय योजना आहे. ही योजना जाहीर झाल्याने अनेक नागरिकांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
पनवेल महापालिकेने मालमत्ता कराची वसुली करण्यास सुरुवात केल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 24 मार्च 2021 रोजी आयुक्तांना पत्र लिहून कोरोनामुळे अनेक नागरिकांचे व्यवसाय बंद पडले आहेत, तर काहींच्या नोकर्या गेल्या आहेत. त्यातच पुन्हा कोरोना वाढीस लागल्याने नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरणे शक्य होत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीचा विचार करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर भरण्याची मुदत वाढवून 30 एप्रिल 2021 करावी आणि शास्ती अभय योजना सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिल्याने ज्यांनी अजूनही मालमत्ता कर भरला नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. पनवेल महापालिका हद्दीतील मालमत्ता करावर 2020-21 या वर्षापर्यंत लावण्यात आलेल्या मालमत्ता करावरील व्याज/ दंड/ शास्ती येत्या 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण कर भरल्यास 50% सवलत/माफी देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत कर भरणा केल्यास 25% सवलत/ माफी देण्यात आली आहे, तसेच संपूर्ण मालमत्ता कर (शासन कर वगळून) एकत्रित भरल्यास नियमानुसार पाच टक्के व ऑनलाइन कर भरणा केल्यास अतिरिक्त दोन टक्के सूट देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, त्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment