पालकमंत्री आदिती तटकरेंच्या प्रयत्नांतून रायगड जिल्ह्यात स्थापित होणार शासकीय विधी महाविद्यालय
*प्रस्ताव त्वरित सादर करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश*
अलिबाग,जि.रायगड:-
माणगाव तालुक्यातील मौजे जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर नियोजित शासकीय विधी महाविद्यालय स्थापित करण्यासाठी विभागाने त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
कोकण विभागासाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव परिसरात शासकीय विधी महाविद्यालय सुरु व्हावे, अशी मागणी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी व पालक यांची होती. त्यास अनुसरुन राज्यमंत्री विधी व न्याय तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी विधी व न्याय राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री. माने व सह संचालक संजय जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या मौजे जावळी, ता. माणगाव येथे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या सुमारे 4 हेक्टर शासकीय जमिनीवर शासकीय विधी महाविद्यालयाची स्थापना झाल्यास रायगड व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शिवाय महाविद्यालयासाठी आवश्यकतेहून अधिक जागा उपलब्ध असल्याने भविष्यात होणाऱ्या महाविद्यालयीन विस्तारासाठी या जागेचा निश्चित उपयोग होऊ शकेल.
या बैठकीच्या अनुषंगाने सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय यांनी संबंधित जागेची तातडीने पहाणी करुन विभागामार्फत प्रस्ताव सादर करावा. तसेच जावळी, ता. माणगाव येथे शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी संबंधितांना यावेळी दिले.
Comments
Post a Comment