जळगावत दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या २० वर्षीय तरुणीवर तिघांनी केला बलात्कार
जळगाव :
पीडित तरुणीचा आज, मंगळवारी पहाटे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणीच्या मामाने याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तिघा नराधमांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील पारोळा शहरात ही धक्कादायक घटना घडली.
पीडित तरुणी ही पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील रहिवासी होती. दिवाळी सणासाठी ती ३ नोव्हेंबर रोजी तिच्या भावासह पारोळा येथे मामाच्या घरी आली होती. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता तरुणी औषधे आणण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तरुणीच्या नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. म्हणून तिच्या मामाने ८ नोव्हेंबर रोजी सकाळी पारोळा पोलीस ठाण्यात भाची हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता तिच्या मामाला एका तरुणीला विषबाधा झाली असल्याने तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. मामाने रुग्णालयात जाऊन खात्री केली असता ती त्यांचीच भाची होती. रुग्णालयात तरुणीवर उपचार सुरू होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्याचा सल्ला दिला. म्हणून तिला तातडीने रुग्णवाहिकेतून धुळ्याला नेण्यात आले. धुळ्याला जात असताना तरुणी शुद्धीवर आली. आपले अपहरण करून तीन तरुणांनी सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर एका महिलेच्या मदतीने बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने नातेवाईकांना सांगितले. अत्याचार करणाऱ्या टोळी गावातील तीन तरुणांची नावेही तिने सांगितली.
उपचारादरम्यान मृत्यू
पीडित तरुणीला तिच्या नातेवाईकांनी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. ९ नोव्हेंबर रोजी पीडितेची प्रकृती चिंताजनक होती. तिला बोलताही येत नव्हते. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. तिने वैद्यकीय महाविद्यालयात अखेरचा श्वास घेतला.
Comments
Post a Comment