विधानपरिषदेसाठी शिवसेनेत मतभेद
मुंबई :
महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून रजनीताई पाटील, सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन, आणि गायक अनिरुद्ध वनकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवणार आहे. राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की, आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर लक्ष असेल. यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी व न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरुन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सर्व निकषात ही नावं बसावीत, अन्यथा पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे उर्मिला मातोंडकरांच्या नावावरुन शिवसेनेत मतभेद असल्याची माहिती पुढे आली आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेत दोन मत प्रवाहनिर्माण झाले आहे. आयात लोकांना संधी मिळत असल्याने पक्षात प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेत कलाकार, साहित्यिक, समाजसेवकांची मोठी संख्या आहे पण नेहमीप्रमाणे बाहेरुन येणाऱ्याना प्राधान्य देण्याचा पांयडा पडला असल्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याची कुजबुज सध्या सुरु झाली आहे. काही नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षातली अस्वस्थता मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर उर्मिलाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यावर पेच निर्माण झाला आहे.
तसेच उर्मिला मातोंडकर आणि शरद पोंक्षे यांच्यानतर आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांचं नावही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी चर्चेत आहे. रेणुका शहाणे यांना विधानपरिषदेवर पाठवा अशी मागणी काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मेंशन करुन ट्विटरवर त्यांनी ही मागणी केली. रेणुका शहाणे या समाजभान जपणाऱ्या अभिनेत्री आहेत. अनेक मुद्द्यांवर त्या अभ्यासपूर्ण आणि परखड भाष्य करत असतात. त्यामुळे निर्भीड रेणुका शहाणे यांना पाठवून न्याया द्यावा, असं जुन्नरकर यांनी म्हटलं आहे.
Comments
Post a Comment