इन्स्पायर अवार्ड नामांकांसाठी मुंबई विभागात रायगड जिल्हा अव्वल
रायगड, प्रतिनीधी
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत सहावी ते दहावीच्या विद्यार्थांसाठी इन्स्पायर अवार्ड योजनेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे ,शोध आणि विकास यांची सांगड घालून ,त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देणे,समाजोपयोगी साधननिर्मिती करून ,दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास प्रेरणा देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. कोरानामुळे अजूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे नामांकन करणे , ही बाब शिक्षण विभागाला अवघडच होती.परंतु हे आव्हान स्वीकारून रायगड जिल्हातील ४६९ विद्यार्थ्यांचे नामांकन करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. मुंबई ,ठाणे ,पालघर जिल्हापेक्षा जास्त नामांकन करून रायगड जिल्हा या जिल्हांपेक्षा अव्वल ठरला आहे. हे नामांकन वाढीसाठी रायगड जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग व रायगड जिल्हा गणित विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने युट्युब वर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री.रोहिदास एकाड सर (अध्यक्ष ,विज्ञान अध्यापक संघ पुणे) यांनी शाळा नोंदणी ,विद्यार्थी नोंदणी व प्रकल्प कसे असावेत याविषयी मार्गदर्शन केले. तसेच राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर यांनीही शिक्षकांना त्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचे नामांकन करताना शिक्षकांना बऱ्याच अडचणी येत होत्या .त्या सोडवण्यासाठी विज्ञान पर्यवेक्षक सविता माळी ,माध्यमिक शिक्षण विभागातील रीना पाटील ,श्री.अनिल पाटील (अध्यक्ष ,पनवेल तालुका मंडळ ),श्री. दाजीबा ठोंबरे (अध्यक्ष ,रायगड जिल्हा विज्ञान मंडळ ) यांनी जिल्हांतील शिक्षकांना मार्गदर्शन करून तांत्रिक अडचणी सोडविण्यास मदत केली. जिल्हांतील वाढलेल्या विद्यार्थी नामांकांसाठी रायगड जिल्हाचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री.भाऊसाहेब थोरात ,रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ.किरण पाटील यांनी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक,गटशिक्षणाधिकारी व पनवेल डाएट यांचे कौतुक केले.
Comments
Post a Comment