कोकणात ठाकरे आणि राणे कुटुंबात वादाला सुरुवात ; सभापती भाजपात
सिंधुदुर्ग, प्रतिनीधी
शिवसेनेला कुडाळमध्ये मोठा धक्का बसला आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत आता भाजपची सत्ता आली आहे. वैभव नाईक हे सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातच नितेश राणेंनी शिवसेनेला जबर धक्का दिला. वैभव नाईक यांच्या मतदारसंघातच सेनेला सुरुंग लागल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून ठाकरे आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. आता याचे पडसाद स्थानिक राजकारणातही उमटताना दिसत आहेत. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मालवण मतदारसंघातच भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला. कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यात अनेक वेळा थेट लढत पाहायला मिळाली आहे.
नूतन आईर यांच्यासह रांगणा तुळसुली गावाचे सरपंच नागेश आईर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ‘ओम गणेश’ बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाला. नितेश राणे यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. सिंधुदुर्गातील शिवसेनेचे दोन्ही आमदार बिनकामाचे आहेत हे आता लोकांनाही कळू लागलं. त्यामुळे भाजपमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत. या पुढील सर्व निवडणुकीत भाजपचेच आमदार, खासदार दिसतील अशी प्रतिक्रिया यावेळी नितेश राणे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment