म्हसळा पोलिसांना चोर घाबरले,परत आणून ठेवला मुद्देमाल
म्हसळा / रायगड मत (प्रतिनिधी)
काही दिवसांपूर्वी म्हसळा शहराजवळ एका प्रतिष्ठित हॉटेल विचारेमध्ये चोरी झाली होती. सर्वत्र म्हसळा तालुक्यामध्ये जबरदस्त चर्चा चालू होती. मात्र या चर्चेला आता दुसरेच वळण लागले आहे. काही लोकांनी पोलीस काय करीत नाहीत? काय करतात पोलीस? अशा वल्गणाही केल्या होत्या. मात्र पोलीस आपले डोके शांत ठेवून काम करीत होते. अत्यंत खुबीने म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि त्यांचे सहकारी यांनी या चोरीची चौकशी लावून धरली. चोर हा जवळचा व माहितीतलचा असावा. याचा अंदाज पोलीसांनी बांधला आणि काय चमत्कार चोरांनी आपला चोरुन नेलेला माल हॉटेल शेजारी आणून टाकला.
सगळ्यांच्या भुवया उंचावणारी ही स्टोरी. याबाबतीत धनंजय पोरे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजी माणगांव - दिघी हायवेवर म्हसळा शहरानजीक असणा-या विचारे हॉटेल मध्ये चोरीचा प्रकार घडला. भुरट्या चोरांनी हॉटेल फोडून जवळ जवळ 60 हजार रूपये किमतीचे दोन फ्रिज चोरल्याचे निदर्शनास आले. म्हसळा पोलीस स्टेशनला 16 ऑक्टोबरपासून गुन्हा गु.र.नं.53/20 भा.द.वि. 454, 457, 380 नोंद करून तपास सुरु केला. काही दिवस तपासाची चव्रे फिरवल्यानंतर चोरांना आपण पकडले जाण्याची भीती निर्माण झाली असावी. म्हणून त्यांनी शनिवारी 24 ऑक्टोबर रोजी सॅमसंग कंपनीचा फ्रीज आणि ब्ल्यू स्टार कंपनीचा 300 लीटरचा फ्रीज हॉटेल शेजारी आणून सोडला, अशी माहिती मिळाली. बहुतेक चोर घाबरले असावेत आणि याची माहिती विचारे हॉटेलचे मालक विचारे यांनीच पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस जाऊन मुद्देमालाची खात्री करून पंचनामा करून मालकाला ताब्यात देण्यात आले.’’
अशी हकीकत पोरे यांनी सांगितली. मात्र आता प्रश्न हा विचारला जातोय की हे कसे काय चोराला कळले. की आपण पकडले जाऊ की काही वेगळे होते? असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे चोर जवळचेच आहेत का? चोरी करणा-यांनी फक्त फ्रिजच का उचलले? त्याठिकाणी लाखो रुपयें किमतींच्या बॅट-या, पीठाची चक्की, गीझर व इतर साहित्य महागड्या शेगड्या, फर्निचर का चोरीला गेल्या नाहीत? फक्त फ्रीज का चोरीला गेले ? हा एकच प्रश्न सद्या म्हसळा पोलीस स्टेशनला आणि म्हसळ्याच्या जनतेला पडला आहे. चोर ‘‘कोल्ड्रींक्स पिणारे’’ तर नव्हते ना? त्यासाठी त्यांच्या अड्यावर त्यांना थंडगार पाण्यासाठीतर फ्रीज चोरला नसेल ना? काही गँग काही कारणासाठी फेमस आहेत. ही चोरांची गँग ‘‘कोल्ड थीपर’’ तर नाहीत ना अशी ही चर्चा केली जाते.
ते काहीही असो पण गेल्या अनेक दिवसांपासून म्हसळा पोलिसांची चांगलीच ‘‘जरब’’ चोरांवर बसलेली दिसत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लवकरच पोलीस चोरांना अटक करतील असा विश्वास म्हसळा पोलीसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस नाईक शाम कराडे, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, कॉन्स्टेबल तोरसल्ले व पोलीस कॉन्स्टेबल सांगले हे करीत आहेत.
Comments
Post a Comment