आदिवासींची गणना विशेष धर्मकोडनी करावी !
पनवेल, आदिवासी हे हिंदू नसून मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून आदिवासींना हिंदू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आदिवासी मूलनिवासी आहेत, या देशाचा खरे मालक आहेत. मनुवादी विचारसरणीकडून आदिवासींचे अस्तित्व संपविण्याचे कट कारस्थान आखण्यात आले आहे असा आरोप करत हे हाणून पाडण्यासाठी जणगणनेत आदिवासी धर्म कोड कॉलम ७ नमूद करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
देशाच्या चालू जनगणनेत आदिवासींची गणना हिंदू धर्मात न करता आदिवासींसाठी विशेष धर्मकोड तयार करून त्यात त्यांची नोंद करावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास केली आहे. संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष दत्तात्रेय सुपे, रायगड जिल्हाध्यक्ष रामभाऊ भस्मा यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना हे निवेदन देण्यात आले आहे. देशभरात या प्रकारच्या मागणीचे निवेदन देण्यात आले असल्याचे संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष संजय चौधरी यांनी सांगितले.
६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यात येऊ नये, परतीच्या पावसात शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा अनेक मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत. रायगडच्या निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांना निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष कांता पादीर, पनवेल तालुका अध्यक्ष संजय चौधरी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment