इंडिया बुल्स येथे रुग्णांना होणाऱ्या असुविधेबाबत विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली पाहणी
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी गुरुवारी (ता. २) इंडिया बुल्समधील कोविड केअर सेंटरचा पाहणी दौरा केला. येथील कोविड रुग्णांची गैरसोय होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने पनवेल महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना करण्याची यावेळी मागणी केली. यावेळी शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, पालिकेचे वरिष्ठ अभियंता संजय कटेकर हे उपस्थित होते.
इंडिया बुल्स, कोन येथे कोरोना रुग्णांना राहण्यासाठी केंद्र उभारले आहे. या केंद्राच्याबाबत रुग्णांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. यामध्ये त्यांना दिले जाणारे अन्नाचा दर्जा, त्यांना दिली जाणारी औषधे, त्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्याविषयी इतर सुविधा इत्यादी प्रकारच्या अनेक तक्रारी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यापर्यंत आल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी इंडिया बुल कोरोना केंद्रांमध्ये जाऊन पाहणी केली असता या केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे त्यांना आढळले. 300 ते 400 रुग्णांच्या तपासणीसाठी फक्त दोन पल्स ऑक्सीमीटर आणि फक्त दोन इन्फ्रारेड थरमोमीटर गन तेथे उपलब्ध होत्या आणि त्याही सेल नसल्यामुळे नादुरुस्त होत्या. एवढी केविलवाणी अवस्था येथील पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेची आहे. तेथे काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी हॅन्ड ग्लोज, हेड शिल्ड, सेनीटायझर इत्यादी आवश्यक वस्तूंचा वापर केलेले दिसत नव्हता त्यावेळी चौकशी केली असता पनवेल महानगरपालिकेकडून त्यांना त्याचा अपुरा पुरवठा होत आहे. असल्याचे समजले. या अनुषंगाने प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,सद्यस्थितीला इंडिया बुल्स याठिकाणी ५०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त असलेल्या व्हिटॅमिन सी च्या गोळ्या अद्याप दिल्या नाहीत. पिण्यासाठी व अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. थंड पाण्याने आंघोळ केल्याने सर्दीचा त्रास होत आहे. रुग्ण तपासणीसाठी केवळ २ पल्स ऑक्सिमीटर आहेत. सेल नसल्याने इन्फ्रारेड थर्मामीटर गन बंद आहेत.वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने साधने अपुरी आहेत. रुग्णांच्या तसेच कोविड सेंटरच्या स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. रुग्णांच्या नातेवाईकांची बसण्याची सोय नाही. सॅनिटायझर्स स्टॅन्ड नाहीत. याबाबत तात्काळ कार्यवाही करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.
रुग्णांना मिळणारे जेवण आणि नाश्त्या बद्दल चौकशी केली असता त्याचा दर्जाही पौष्टिक नसल्याचे आढळून आले,पौष्टिक जेवण मिळत नसल्याच्या कारणाने तेथील कर्मचारी घरून जेवण घेऊन येतात अशा प्रकारची माहिती मिळाली. पेशंट ना देण्यात येणाऱ्या विटामिनच्या गोळ्या उपलब्ध नव्हत्या असे आढळले. इमारतींमधील लिफ्ट वारंवार नादुरुस्त असतात त्यामुळे पेशंटना दहा-दहा माळे चालत वर खाली करावे लागते. एखाद्या पेशंटला अस्वस्थ वाटल्यास त्यांना ॲम्बुलन्स मधून रुग्णालयात नेले जाते व तेथे जागा उपलब्ध नसल्याने पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी आणून आरोग्य केंद्रामध्ये सोडले जाते या मधून कोणतेही रुग्णालय प्रशासन आणि कोरोना सेंटर प्रशासन यामध्ये समन्वय नसल्याचे आढळून आले. त्या रुग्णांना वाहतुकीची सेवा देणारे तेथील ऍम्ब्युलन्स चालकांना आरोग्य सुरक्षेसाठी कोणतीही सोय नाही.पेशंट प्रवासानंतर त्या ॲम्बुलन्स सॅनिटाईझ करण्याची व्यवस्था नाही. 24 तास सेवा देणाऱ्या चालकांना तेथे आराम करण्यासाठी कोणतेही कक्ष नाही. त्यांना वैयक्तिक सुरक्षेसाठी सेनिटायझर सेफ्टी शूज , ग्लोज आणि मास्क देण्यात आलेले नाहीत.
वरील सर्व गोष्टी गंभीर असून एखादी संशयित व्यक्ती तपासणी केल्यावर रिपोर्ट येण्याच्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या केंद्रामध्ये आपण ठेवतो. दोन दिवसांपूर्वी केलेल्या तपासणीमध्ये ती व्यक्ती निगेटिव्ह आल्यानंतर आपण त्या व्यक्तीला घरी सोडून देतो अशा वेळेस या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये सदरच्या अव्यवस्थेबाबत ती व्यक्ती पॉझिटिव्ह होण्याचा संभव जास्त होऊ शकतो व ती घरी आल्यामुळेप आजूबाजूच्या लोकांनाही त्याच्या संक्रमणाचा धोका वाढू शकतो आपण या सर्व गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालून ठोस पावले उचलावीत. आपणास वरील उपाय योजनांमध्ये काही तांत्रिक अडचण असल्यास शेतकरी कामगार पक्ष आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment