आ.अनिकेत तटकरे यांचा पाठपुरावा.नागरिकांना मिळाला दिलासा
श्रीवर्धन - भारत जाधव : - श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात स्त्री-रोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीवर्धनकर नागरिकांना विशेषतः महिलांना दिलासा मिळाला आहे. यासाठी आ. अनिकेत तटकरे यांनी पाठपुरावा केला होता.
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोग तज्ञ डॉ.मधुकर ढवळे हे रजेवर असल्याने, श्रीवर्धन तालुक्यातील विशेष करुन प्रसूतीसाठी येणार्या स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. एखाद्या गर्भवती स्त्रीचे सिझर करण्याची वेळ आली तर त्या रुग्णाला महाड, माणगाव किंवा अलिबाग या ठिकाणी पाठवावे लागत होते. त्यामुळे श्रीवर्धनमधील काही जागरुक नागरिकांनी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी यांना निवेदन देऊन श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नेमण्याची मागणी केली होती. या निवेदनाची प्रत आमदार अनिकेत तटकरे यांनाही देण्यात आली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, आ.अनिकेत तटकरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचेही लक्ष वेधले. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून श्रीवर्धन येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.विनिता जोशी व भूलतज्ञ डॉ.अमोल जोशी यांची तात्पुरत्या स्वरूपात श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीवर्धनमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आता श्रीवर्धन तालुक्यातील प्रसूतीसाठी येणार्या महिला रुग्णांना अन्य कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामुळे महिलावर्गामधूनही समाधान व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment