आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी वारदोली, बेलवली परिसरात, वाड्या वस्तीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद
पनवेल (प्रतिनिधी) निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यालाही बसला. या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज(शनिवारी) वारदोली, बेलवली परिसरात, वाड्या वस्तीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत लवकरात लवकर संबंधित वादळग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे तालुका मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुका मंडल अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच बबन पवार, माजी सरपंच जगदिश ढवळे, आप्पा भागीत, संदेश पाटील, जितू बताले, नारायण भोपी, सागर फडके, जगदीश केंगे, नामदेव भूतांबरा आदी उपस्थित होते.आज वारदोली, हालटेप ठाकूरवाडी, बेलवली, तारटेप ठाकूरवाडी आदी ठिकाणी पाहणी केली. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी नेरे आणि शिरवली परिसरातील आदिवासी वाड्या व पाडयामध्ये भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या तांडवामुळे लाखो झाडे उन्मळून पडले आहेत. त्याचबरोबर वाहनांवर महाकाय वृक्ष पडून मोठे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातही बसला. तालुक्यात जवळपास दोन हजार घरांची पडझड झाली आहे. सव्वादोनशे एकर शेतीचे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. दीड हजारांच्या आसपास झाडे उन्मळून पडली आहेत. सुदैवाने तालुक्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. विशेष करून आदिवासी वाड्या पाड्यांवर मोठे नुकसान झाले आहे. अनेक घराचे पत्रे उडून गेले आहेत. तर काहींच्या घरांच्या भिंतीची चक्रीवादळामुळे पडझड झाली. अगोदरच कोरोना या वैश्विक संकटात हवालदिल झालेला आदिवासी वाड्या पाड्यांवर चक्रीवादळाची अवकृपा झाल्याने नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी काल आणि आजही विविध ठिकाणच्या नुकसानग्रस्त भागात जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली आणि ग्रामस्थांना दिलासा दिला.
Comments
Post a Comment