उद्धव ठाकरे सरकार सपशेल अपयशी राज्य सरकार अत्यावश्यक सेवेलाच सुरक्षित करू शकले नाही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सरकारवर हल्ला कोकण दौऱ्याला पनवेल पासून सुरुवात
समन्वयाचा अभाव आणि गंभीर नसलेले हे राज्याचे आघाडी सरकार - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे अत्यावश्यक सेवेत काम करीत आहेत ,अशा कोविड योद्ध्यांची शासन सुरक्षिततेची काळजी घेऊ शकले नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासह इतरांना संसर्ग होत आहे, असे सांगत उद्धव ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिपादन करून आघाडी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.
मंगळवारपासून विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजप आमदारांसमवेत कोकण दौऱ्याला पनवेल येथुन सुरुवात झाली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.
कोकणामधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणे व त्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने आज(मंगळवार, दिनांक १९ मे) पासून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयाचा दोन दिवसीय दौऱ्याला पनवेलपासून सुरुवात झाली. सर्वप्रथम कामोठे एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्था पाहणी केली. रुग्णांना योग्य उपचार देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देऊन कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांना आश्वस्थ केले.
कळंबोलीतील देवांशी ईन हॉलमध्ये फिजिकल डिस्टन्स आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून हि पत्रकार परिषद अत्यंत शिस्तबद्ध पार पडली.
मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यांच्यामुळे कुटुंबीयही बाधित होत आहेत. या सर्वांची हे संकट टळेपर्यंत कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आम्ही सर्वांनी शासनाकडे मागणी केली होती. टाटा मंत्रा, इंडिया बुल्स याशिवाय अनेक पर्याय आम्ही त्यांना दिले होते. मात्र राज्य शासनाने यासंदर्भात गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणाम रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादात राज्यात तालुका पातळीवर काॅरन्टाईन सेंटर सुरू करू शकलो नाही. अशी स्पष्ट कबुली दिली असल्याचे दरेकर यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईत असणाऱ्यांना गावाला जाता येत नसल्याची खंत विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केली . हे राज्य सरकारचे अपयश असल्याचेही ते म्हणाले. सुरुवातीला आम्ही केंद्राची मदत घेणार नाही असे ते सांगत होते. मात्र आता केंद्राकडून मनुष्यबळ मागावे लागलेच. कोणतीही गोष्ट प्रतिष्ठेचे न करता केंद्राबरोबरच समन्वय साधून एक योजना बनवावी जेणेकरून कोरोना हे संकट परतवून लावता येईल असे मतही दरेकर यांनी व्यक्त केले. पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी गृहमंत्र्यांना टीकेचे लक्ष केले. कोविड बरोबर दोन हात करत असताना पोलिसांवर ठराविक ठिकाणी वेगळ्या प्रवृत्तीचे व मानसिकतेचे लोक हल्ले करीत आहेत. गृहमंत्री मात्र हल्ले खपून घेणार नाही इतकच बोलताहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. कोविड१९ चाचण्यांसाठी सर्वसामान्यांकडून पैसे घेतले जात असल्याच्या प्रश्नावर प्रवीण दरेकर म्हणाले की याबाबत आम्ही अगोदरच राज्य शासनाकडे मागणी केली आहे. या सर्व चाचण्या मोफत होणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांना एकही रुपया खर्च येता कामा नये ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे लावून धरु अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबई वरळी येथील लॅब मध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट जास्त येत असल्याने सरकारने त्या लॅबवरच बंदी घातली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. कोकणवासियांनी शिवसेनेला कायम झुकते माप दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या अनेक अपेक्षा होत्या. मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. आगामी काळात कोकणातील जनता शिवसेनेला धडा शिकवायल्या राहणार नाही. असेही प्रवीण दरेकर म्हणाले. केंद्र सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे नक्कीच नागरिकांना दिलासा मिळेल असे ते म्हणाले. कोरोनानंतर जी परिस्थिती येणार आहे. त्याबाबत नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याचे कुठलेही नियोजन आघाडी सरकारकडे नसल्याची टीका दरेकर यांनी केली. राज्य सरकार जनतेच्या रक्षणासाठी गंभीर नसले तरी विरोधी पक्ष जागरूक आहे, त्या अनुषंगाने काम करत जनतेच्या भल्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करणार आणि या कोकण दौऱ्याचे जनतेसाठी चांगले फलित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चौकट
आरोग्य मंत्र्यांची घोषणा फक्त घोषणे पुरतीच
१ मे रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्याची घोषणा केली होती. परंतु आजही रुग्णांना पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांची घोषणा ही घोषणे पुरतीच राहिली आशी टीका चव्हाण यांनी केले.
आरोग्य मंत्र्यांची घोषणा फक्त घोषणे पुरतीच
१ मे रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्याची घोषणा केली होती. परंतु आजही रुग्णांना पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांची घोषणा ही घोषणे पुरतीच राहिली आशी टीका चव्हाण यांनी केले.
चौकट-
पनवेल परिसरातून मुंबईला अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अनेक जण जातात. त्यापैकी काहींना कोरोना झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग होत असल्याने रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातून मुंबई शहरात जाऊन सेवा देणाऱ्या सेवाकर्मींची कोरोना संकट संपेपर्यंत मुंबईत राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करा अशी मागणी वारंवार करूनही राज्य सरकार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. समन्वयाचा अभाव आणि गंभीर नसलेले हे राज्याचे आघाडी सरकार आहे. मात्र आम्ही जनतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहू. - आमदार प्रशांत ठाकूर
शासनामध्ये समन्वयाचा अभाव
उरणचे आमदार महेश बालदी यांनी शासकीय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे सांगितले. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्रीचे दुकान सुरू करण्याची मुभा दिली. परंतु नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडून ते सुरू करून दिले जात नाहीत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, उरण या परिसरातून लोक चौक, मोहोपाडा, पेण येथे दारू आणण्यासाठी येतात. या कारणाने संबंधित ठिकाणी संसर्ग होण्याची भीती आहे. याला जबाबदार शासन आणि प्रशासकीय यंत्रणा असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर मच्छीमार बांधवांच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद करून मच्छीमार व शेतकऱयांना न्याय देण्याची भूमिका घ्या, असे राज्य शासनाला सांगितले.
Comments
Post a Comment