जनता व्हेन्टिलेटवर तर मुख्यमंत्री होम कॉरेन्टाईन - आमदार प्रशांत ठाकूर कोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा निषेध
पनवेल(प्रतिनिधी) राज्यातील ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळीपणा कारभारामुळे जनता व्हेन्टिलेटवर तर मुख्यमंत्री होम कॉरेन्टाईन झाले आहेत, अशी जोरदार टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शुक्रवार, दि. २२) येथे केले.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणामध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी ठाकरे सरकारला जाब विचारण्यासाठी उत्तर रायगड भाजप आणि पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने पक्ष कार्यालय येथे फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, युवा नेते दशरथ म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल,युवा मोर्चाचे उत्तर जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र वाचवा महाराष्ट्र वाचवा, कोरोना रोखण्यात निष्फळ ठरलेल्या उद्धव ठाकरे सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो, महाविकास आघाडी सरकार हाय हाय, महाविकास आघाडी सरकार जागे व्हा जागे व्हा भोंगळ कारभार बंद करा, अशा घोषणा यावेळी देऊन गोरगरीब जनतेला पॅकेज द्या अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.
कोरोना योद्धा लढतात या योद्धांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या ऐवजी कोरोना योद्धा आणि त्यांच्या कुटुंबाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. लॉक डॉउन मध्ये राज्यात पोलिसांवर जीवघेणे हल्ले होत आहेत, पोलीस, डॉक्टर, नर्स आदी कोरोना योद्धे जिवानिशी जात आहेत, मात्र हे ठाकरे सरकार अद्यापही निद्रास्त आहे. सरकार म्हणून काम करण्याची गरज असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून आदेश देत आहेत मात्र विधानपरिषदेची उमेदवारी अर्ज कुटुंबासह गर्दीने कसे दाखल करतात, असा सवालही आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांईगतले कि, अगोदरच ताळमेळ नसलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेत कुठलाच ताळमेळ दिसत नाही. एक मंत्री निर्णय घेतो तर दुसरा असे काही नाही म्हणून सांगतो.त्याचबरोबर अधिकारी परस्पर निर्णय घेतात आणि बदलतात. यावर सरकारचे अंकुश नाही. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१ हजारांच्या वर गेलेली आहे. १५०० च्या वर लोक मृत्युमुखी पडले. येत्या मे महिन्याच्या शेवटी महाराष्ट्राचा आकडा हा ६० हजाराच्यावर जाण्याची शक्यता आहे. तरीही ठाकरे सरकारला याचे गांभीर्य दिसत नाही. मुंबईत रुग्णालयांमध्ये बेड, रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत, दोन-दोन दिवस रुग्ण उपचारासाठी तडफडत आहेत. हा गलथान कारभार वारेमापपणे ठाकरे सरकार मुकाटपणे बघत आहे. देशात अनेक राज्य हळू हळू पूर्व पदावर येत असताना महाराष्ट्रावर मात्र कोरोनाचे संकट वाढत आहे. लॉक डॉउन फक्त नावाला दिसत आहे. देशात कोरोनाच्या एकूण संख्येपैकी ३० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तर २४ टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तरीही ठाकरे सरकार हातावर हात धरून बसलेल आहे, असा उल्लेख आ. ठाकूर यांनी केला. पनवेलमधील ८० टक्के रुग्ण मुंबईमध्ये सेवा देणारे आहेत. त्यामुळे सेवाकर्मी व त्यांच्या कटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून पनवेलमधून मुंबईत सेवा देणाऱ्या सेवाकर्मींची व्यवस्था मुंबईमध्येच करावी अशी मागणी केली त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने आदेशही दिले मात्र राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे त्यांनी नमूद करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली करून पनवेलकरांवर अन्याय केला असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.केंद्र सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले मात्र महाराष्ट्र सरकारने एक दमडी सुद्धा सर्वसामान्यांच्या हितासाठी जाहीर केली नाही. असा घणाघाती हल्ला आमदार प्रशांत ठाकूर यानी राज्य सरकारवर चढवला. पुरोगामी महाराष्ट्राने देशाला आणि जगाला आदर्श दिला मात्र हे दिशाहीन महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला संकटातच अडकून ठेवू पाहत आहे, अशी खरमरीत टीका करून राज्य सरकारने आता तरी जागे व्हावे, असेही त्यांनी म्हंटले.
चौकट-
पनवेलसह खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामीण भागात, गावागावात ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभे राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून तसेच काळे फलक हातात घेऊन 'माझं अंगण रणांगण', 'महाराष्ट्र बचाव' अंतर्गत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले.
Comments
Post a Comment