म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर
म्हसळा प्रतिनिधी - श्रीकांत बिरवाडकर - देशात व राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाचे पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात काही जिल्ह्यात शिथिल करण्यात आल्या असून तसेच रायगड जिल्ह्याचा ऑरेंज झोन मधे समावेश झाल्याने म्हसळा तालुक्यातील विविध सेवा सुरू होणार अशी माहिती नागरिकांमध्ये पसरली आहे.
दि.4 मे ला लॉकडाऊन पुन्हा सुरू झाल्याने अनेक नागरिक संभ्रमात आहेत. बाजारपेठ मधील काही दुकाने सुरू होणार आणि कडधान्य, भाजीपाला व मेडिकल सह अन्य सेवा सुविधा सुरू होणार अशी माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले. दि.4 व 5 तारखेला म्हसळा बाजारपेठ मधील कडधान्य, भाजीपाला, मेडिकल सह इतर काही सेवा सुविधांची दुकाने उघडली गेली होती. त्यामुळे 17 मे पर्यत घोषित केलेल्या लॉकडाऊन काळात म्हसळा बाजारपेठ बंद राहणार की सुरू राहणार याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. तसेच स्थानिक म्हसळा नगरपंचायत बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार आहे याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
म्हसळा तालुक्यातील बाजारपेठेत दोन दिवस गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून येत होते, नागरिक बिनधास्तपणे बाजारात फिरताना दिसत होते. तर काहीजण मास्क किंवा तोंडाला रुमाल वैगरे काहीच न बांधता फिरत होते. आता विनाकारण बाजारात फिरणाऱ्यांवर पोलीस किंवा नगरपंचायत प्रशासन कोणतीच कारवाई करीत नाहीत. तालुक्यात मागील आठ दिवसात शेकडो नागरिक चाकरमनी मुंबईतुन गावाकडे आलेले आहेत. त्यामुळे गावागावात भीतीचे वातावरण आहे आणि त्यातच दोन दिवस बाजारपेठ सर्वांसाठी खुली असल्याचे चित्र आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात येऊन गर्दी करीत आहे. मागील दीड दोन महिन्यांपासून स्थानिक तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन, नगरपंचायत प्रशासन यांच्यामार्फत सुरू असलेली चौकशी आता मंदावली असल्याचे पहायला मिळते आणि स्थानिक प्रशासनात ताळमेळ राहिला नाही. तालुक्यातील जनतेपुढे तहसीलदार पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांनी हात टेकले असून प्रशासन आता हतबल झाले आहे की काय असेच काहीसे वातावरण तयार झाले आहे. परंतु या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले गेले तर म्हसळा तालुका लवकरच कोरोना पॉझिटिव्ह घोषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दोन महिन्यांच्या सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही.
रायगड जिल्ह्यात संचार बंदी सुरू आहे, नागरिकांनी खाजगी वाहने घेऊन रस्त्यावर फिरू नये, चार पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये, सोशिअल डिस्टन्स पाळावे, असे रायगड जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांचे हे सर्व आदेश स्थानिक प्रशासन, व्यापारी वर्ग व नागरिकांनी धाब्यावर बसवले आहेत. दोन दिवस बाजारात होत असलेली गर्दी रोखण्यासाठी ना पोलीस कर्मचारी पुढे येत, ना महसूल प्रशासन, ना नगरपंचायतिचे अधिकारी किंवा कर्मचारी. त्यामुळे म्हसळ्यात बाजारपेठ नेहमी प्रमाणे नियमित सुरू झाली आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे. देशात सुरू असलेले लॉकडाऊन, संचार बंदी, सोशिअल डिस्टन्स या नियमांचा मात्र तालुक्यात बोजवारा उडाला असून गर्दी रोखण्यासाठी प्रशासनातील अधिकारी पुढे का येत नाहीत हा प्रश्न अनेकांना पडला असून तालुक्याचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरपंचायतिचे मुख्याधिकारी दोन दिवस गप्प का आहेत..? हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे.
मागील दीड दोन महिने तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणांनी मेहनत घेऊन तालुका कोरोना मुक्त राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. परंतु आता दोन दिवस सर्वांकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याने वातावरण गंभीर होण्याचे चिन्ह दिसत असून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याबरोबरच जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच तालुका पातळीवर स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी यांनी विशेष लक्ष देऊन म्हसळा तालुक्यातील संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गाला सूचना देऊन आगामी काळात कोरोनाला रोखण्यासाठी अजून कठोर पावले उचलण्यासंदर्भात सूचना कराव्यात व सध्या दोन दिवस बाजारात होत असलेली गर्दी, सोशिअल डिस्टनस, संचार बंदी, खाजगी वाहतूक या प्रश्नांची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
बियर शॉपी बाहेर तळीरामांची झुंबड ,आज मंगळवारी बाजारातील बियर शॉपी सुरू केल्याने सकाळपासूनच तळीरामांची दुकानाबाहेर झुंबड उडाली होती. अनेकांनी मिळेल त्या वाहनाने बियर शॉपी च्या दुकानाची वाट धरली होती. कित्येक दिवस हे शौकीन बियर पाण्यापासून वंचित राहिले होते मात्र मंगळवारी दुकाने उघडल्याने अनेकांनी आपली बियर पिण्याची इच्छा पूर्ण केली. मात्र देशी दारूची दुकाने न उघडल्याने देशी दारू पिणाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली. देशी दारू न मिळाल्याने अनेकांनी खाली हात घराची वाट धरली.
Comments
Post a Comment