अनिल परब यांच्या आश्वासनानंतर एसटी महामंडळाचा गोंधळ मोफत प्रशासाठी पनवेल बस स्थानकात गर्दी मात्र अशी सूचना नसल्याचा कर्मचाऱ्यांचा निर्वाळा
पनवेल : राज भंडारी
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात एसटी महामंडळाकडून याला कोणत्याही प्रकारची पुष्टी मिळालेली नसतानाच यावरून झालेल्या गोंधळामुळे अनिल परब यांनी केलेली घोषणा तूर्तास तरी स्थगित करण्यात आली. सोमवारी पनवेल एसटी बस स्थानकाजवळ परराज्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
यावेळी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मोफत सेवा उपलब्ध नसल्याचे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सांगण्यात आल्याने प्रवाशांचा भ्रमनिरास झाला. यावेळी परराज्यातील नागरिकांनी आपापले सामान घेऊन बस स्थानक परिसरातच तळ ठोकला. तर यावेळी एस टी महामंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवेमार्फत प्रवास करण्याऱ्या जबाबदार कर्मचाऱ्यांकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आवाहन करीत आहे तर दुसऱ्या बाजूला अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारीच सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजवताना दिसत आहेत.
Comments
Post a Comment