उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून होणार सुटका आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न आले कामी
पनवेल(प्रतिनिधी) दरवर्षी उमरोली येथील नागरिकांना पावसाळ्यात छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. आता नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यंदाच्या पावसाळ्यातील उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न कामी आले आहेत.
पावसाळ्यात गाढी नदीला पूर येत असल्याने पुलावरून (फरशी) पाणी जाते. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालक वर्ग चिंतेत असतो. याकडे विशेष लक्ष देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमरोली येथील पुलासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर उमरोली गावाच्या गाढी नदीवरील पुलासाठी १ कोटी ४५ लाख १४ हजार रुपये मंजूर करण्यात आले. २०१९ मध्ये नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली व सद्य:स्थितीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पनवेल शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर उमरोली गाव वसलेले आहे. उमरोली येथे जाण्याच्या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने अतिवृष्टी झाल्यास गावात जाण्याचा मार्ग दोन-तीन दिवस बंद राहतो. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी होती. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलेल्या या प्रश्नामुळे येथील नागरिकांची पावसाळ्यातील जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे. त्याबद्दल येथील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment