कोरोना नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्य शासनावर टीकास्त्र
पनवेल(प्रतिनिधी) पनवेलमधील कोरोना रुग्णांमध्ये बहुतांश मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे आणि त्यांचे कुटुंबी आहेत. लॉकडाऊनला आतापर्यंत लोकांनी सहकार्य केले. आज ५५ दिवस होऊन देखील कोरोना नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आघाडी शासनावर सोडले आहे.
पनवेल परिसरातून मुंबईला अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अनेक जण जातात. त्यापैकी काहींना कोरोना झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग होत असल्याने रुग्ण संख्या वाढत चालली आहे. दरम्यान पनवेल तालुक्यातून मुंबई शहरात जाऊन सेवा देणाऱ्या सेवाकर्मींची कोरोना संकट संपेपर्यंत मुंबईत राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. तसे झाले नाही तर ४ मेपासून मेडिकल वगळता इतर सेवा बंद पाडू असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला होता. दरम्यान त्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईत करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले होते. २ मे रोजी आदेश निघाला, पण अजूनही अंमलबजावणी नाही. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाले आहेत.
अत्यावश्यक सेवेतील अनेक कोरोना योद्ध्यांच्या मृत्यूनंतर नकाराश्रू ढाळण्यापेक्षा जिवंतपणी त्यांना वाचवण्याची उपाययोजना काय, त्यांना पुरेसे साहित्य उपलब्ध करून देणार काय? असा सवाल त्यांनी थेट शासनाला विचारला आहे. अनेक राज्यातील सरकारे केंद्रावर फक्त अवलंबून न राहता स्वतः अनेक गोष्टींची पूर्तता करत आहेत. आपण केंद्राने काय दिले आणि नाही दिले यापलीकडे स्वत: काही करणार आहात का असाही प्रश्न त्यांनी आघाडी सरकारला उद्देश उपस्थित केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा अनुभव कमी पडत असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय आणि ही धोक्याची घंटा आहे. या शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी टिकास्त्र सोडले आहे.
मुख्यमंत्री कोरोना वॉरीअर्स चे तोंडी कौतुक करतात. असा आरोप करून कोरोना वॉरीअर्सच्या कुटुंबाचे संरक्षण कसे करणार,यावर उपाययोजना काय याचे मला आणि माझ्या पनवेलच्या जनतेला तातडीने उत्तर द्यावे अशी मागणी आ. ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे.
Attachments area
Comments
Post a Comment