म्हसळ्यात होम क्वारंटाइन कालावधी नक्की किती दिवसांचा..

 

 


 14 दिवस की 28 दिवस... ग्रामीण भागातील नागरिक संभ्रमात...

 

 प्रशासनात नाही ताळमेळ, गावात होतंय सगळीच भेळ

 

 अनेक समज गैरसमजातून गावागावात होत आहेत वाद

 

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

 

राज्यासह देशात थैमान घातलेल्या कोरोना कोव्हीड -19 विषाणूंना आळा घालण्यासाठी सरकारने देशात चौथ्यांदा 31 मे पर्यत लॉकडाऊन घोषित केले आहे. मुंबईत कोरोना विषाणू बाधित वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता व भविष्यात उद्भवणारा धोका टाळण्यासाठी कोकणातील हजारो चाकरमाण्यानी आपल्या मुळगावाकडे धाव घेतली असून गाव गाठले आहे. गावात आल्यावर काही गावांमध्ये स्थानिक गावकऱ्यांकडून मिळणारी दुजाभावाची वागणूक आणि कोरोनाचे कोव्हीड - 19 साथ रोग आजाराचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले नियम/अटी पाळताना अनेक चाकरमानी हैराण होऊन गेले आहेत. मुंबई, पुणे सारख्या रेड झोन शहरातून गावात आलेल्यांना शासनाच्या नियमानुसार होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. राज्य शासनाने 14 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी दिला असताना रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिह्यात 28 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी आहे.

 म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायत आणि म्हसळा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावागावात, वाडी वस्तीवर हजारोंच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी गावात आलेले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाइन केले आहे. परंतु या क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना नक्की किती दिवस क्वारंटाइन मधे ठेवणार यावरून ग्रामीण भागात नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. कारण होम क्वारंटाइन बाबत कोरोना संसर्ग नियंत्रण पथक यांच्याकडून वेगळी माहिती, ग्रामसेवक, शिक्षक यांच्याकडून वेगळी माहिती, आरोग्य विभागाचे डॉक्टर, अधिकारी यांच्याकडून वेगळी माहिती, तर तहसीलदार व महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून वेगवेगळी माहिती सांगण्यात येते.या सर्व गोंधळलेल्या परिस्थितीत म्हसळा तालुक्यात होम क्वारंटाइनचा कालावधी नक्की किती दिवसांचा आहे..? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला असून आम्ही 14 दिवस क्वारंटाइन रहायचे की 28 दिवस राहायचे...अशी विचारणा गावागावात होत असून शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक संभ्रमात आहेत. तर प्रशासनात नाही ताळमेळ, गावात होतंय सगळीच भेळ अशीच काहीशी अवस्था तालुक्याची झाली आहे आणि या परिस्थितीतुन गावकरी आणि मुंबईकर चाकरमानी यांच्यात अनेक समज गैरसमज निर्माण होत असून गावागावात छोटे मोठे वादविवाद होत आहेत.

तालुक्यातील काही गावांमध्ये 14 दिवस तर काही गावांमध्ये 28 दिवसांचा क्वारंटाइन अशा प्रकारचा भेदभाव आणि त्याच्यातून गावा गावांमध्ये होणारे मुंबईकर व स्थानिक ग्रामस्थांमधील वाद आणि जवळच आलेला पावसाळा त्यात शेतीची रखडलेली कामे या सविस्तर बाबी लक्षात घेऊन तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी वर्गाने नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे. 

 

 कोरोना संसर्ग नियंत्रण कमिटीचे काम राजकीय दबावाखाली..?

      गावागावात तयार करण्यात आलेल्या कोरोना संसर्ग नियंत्रण पथक कमिट्या काही गावात राजकीय दबावाखाली काम करीत असल्याची स्थिती आहे. काही सामान्य नागरिक क्वारंटाइन च्या भीतीने घरात बसून राहत आहेत तर काही ठिकाणी गावातील पुढारी, लोकप्रतिनिधी यांच्या जवळचे नातेवाईक क्वारंटाइन असून सुद्धा बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहेत. सामान्य नागरिक याबाबत बोलले तर त्यांना गाव पुढाऱ्यांची भीती. आणि कोरोना पथक प्रमुख मधील शिक्षक किंवा ग्रामसेवक तसेच इतर सरकारी कर्मचारी माहिती समजावून सांगायला गेले तर त्यांनाही गावपुढाऱ्यांची दमदाटी होत असल्याचे प्रकार घडत असून ही कमिटी राजकीय दबावाखाली काम करीत असल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग नियंत्रण कमिटीचे काम देखील पारदर्शक होत नाही.

 

प्रतिक्रिया :-

  " आमच्या काळसुरी गावात अनेक नागरिक मुंबईतुन आलेले आहेत. सर्वांना शासकीय नियमानुसार होम क्वारंटाइन केलेले आहे. परंतु आता जे लोक क्वारंटाइन केलेले आहेत त्यांना प्रशासनाकडून वेगवेगळी माहिती सांगण्यात येते. क्वारंटाइन कालावधी बाबत लोकांमधे संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोक म्हणतात 14 दिवस तर काहींचे म्हणणे 28 दिवस त्यामुळे क्वारंटाइन नक्की किती दिवसांचा आहे हा प्रश्न पडला आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी क्वारंटाइन केलेले आहे त्या घरात, शाळेत, समाजघर, अंगणवाडी अशा ठिकाणी पाणी, जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर इतर सेवा सुविधा व्यवस्थित रित्या मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच लोकांचे आता शेत शिवाराची कामे सुरू झाली आहेत पावसाळा जवळ आला असून अनेक कामे खोळंबली आहेत त्यामुळे तालुका प्रशासनाने योग्य तसे लक्ष देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समन्वय राखला पाहिजे.

किशोर सावकार

अध्यक्ष - काळसुरी ग्रामस्थ मंडळ मुंबई

 

 "आम्हाला 28 दिवसांचा होम क्वारंटाइन सांगण्यात आलेला आहे. कोरोनाचे विषाणू फैलावू नयेत याची कल्पना आहे परंतु प्रशाकीय यंत्रणेकडून क्वारंटाइन बाबत वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. या अगोदर आम्ही मुंबईत सुद्धा घरीच राहिलो होतो. आता गावाला येऊन पुन्हा 28 दिवस घरीच रहायचे त्यामुळे आमची काही शेतीची कामे करायची आहेत तर ती कशी करायची. 14 दिवस क्वा रं टाइन पाळू शकतो परंतु 28 दिवस घरीच रहाणे खूप कठीण आहे. त्यामुळे 14 दिवसानंतर तोंडाला मास्क बांधून तसेच कोरोना विषाणू पसरू नयेत या बाबतीत सर्वोतोपरी काळजी घेऊन आणि सोशिअल डिस्टन्स बाळगून वैयक्तिक कामे करण्यास प्रशासनाने मुभा द्यावी.

तसेच गावागावात होत असलेले गैरसमज व मतभिन्नता शासनाने दूर करावी.

श्री.प्रणिल रिकामे (होम क्वारंटाइन नागरिक)

मु.जांभूळ युवा कार्यकर्ते

 

 "रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात 28 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी आहे. हा आदेश ज्या ज्या नागरिकांना क्वा रं टाइन केलेले आहे त्या सर्व नागरिकांनी पाळणे बंधनकारक आहे. 

डॉ.गणेश कांबळे

तालुका वैद्यकीय अधिकारी म्हसळा

 

 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर