पोलीस व पत्रकारांच्या कोरोना टेस्ट मोफत करण्याचे तसेच पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्याची नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी
पनवेल : राज भंडारी
कोरोना महामारीमुळे वैद्यकीय सेवा, नगरविकास खात्यांतर्गत असणाऱ्या आस्थापना यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उभे राहून नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी झटत आहेत, तर पत्रकार बांधवही विविध ताज्या बातम्या घरी बसलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. मात्र स्वतःची काळजी घेत असतानाही त्यांनाही बाहेर फिरण्याची मनात असलेली भीती नष्ट होण्यासाठी शासनाच्यावतीने १५ दिवसातून कोव्हीड - १९ म्हणजेच कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. तसेच त्यांना PPE किट आणि जीवनावश्यक वस्तू देखील पुरविण्यात याव्यात यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच तत्कालीन कळंबोली ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र भगत यांनी ई -मेल द्वारे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, पालिका आयुक्त गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्याकडे केली आहे.
यावेळी रवींद्र भगत यांच्या मागणीमध्ये एक मुद्दा त्यांनी आवर्जून उल्लेखलेला आहे, तो म्हणजे पत्रकारांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट पुरविण्याची मागणीही त्यांनी केली आहे. वृत्तपत्र मग ते दैनिक असो किंवा साप्ताहिक. या वृत्तपत्रांचे दावेदार असतात त्यांचे हक्काचे जाहिरातदार. मात्र सर्वच स्तरातून व्यवसाय लॉक डाऊनमुळे बंद पडले असल्यामुळे वृत्तपत्रांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र धाकली मूठ सव्वा लाखांची अशी स्थिती आज पत्रकारिता क्षेत्रातील मंडळींची झाली आहे. त्यातच दैनिकांना त्यांच्या पत्रकारांचे, कार्यालयीन संपादकीय विभागाचे कर्मचारी यांचे पगार अदा करावेच लागत आहेत.
लॉक डाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने जाहिरातदारांचे सहकार्यही बंद झाले आहे. पर्यायाने वृत्तपत्र अडचणीत सापडली आहेत. मात्र आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून याचा गवगवा करू शकत नाही. मात्र पत्रकारही अडचणीत सापडले आहेत का याचा विचार पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी केला आणि त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासह मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्याकडे पत्रकारांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्याची केली आहे.
Comments
Post a Comment