कोविड-१९विरोधातील लढ्यामध्ये लोकांच्या मदतीसाठी टाटा स्टील बीएसएलच्या स्वयंसेवकांकडून खोपोलीत मदतीचे सरसावले हात
पनवेल(प्रतिनिधी) आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील कोविड-१९ चा प्रभाव भारतातील छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये पसरत आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील टाटा स्टील बीएसएल प्लांटच्या हौसिंग कॉलोनीतील स्वयंसेवक आजूबाजूच्या स्थानिक समुदायातील गरीब आणि स्थलांतरित कामगारांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
कंपनीच्या हौसिंग कॉलोनीतील 'क्रिएटिव्ह सोल्स' लेडीज क्लबच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या, रेशन कार्ड नसलेल्या स्थलांतरित कामगार आणि आदिवासी कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप केले आहे. स्थानिक प्रशासन आणि दोन ग्राम पंचायतींनी या दिशेने आधीच सुरु केलेल्या मदतकार्याला हातभार लावणे हा यामागचा उद्देश आहे. कंपनीच्या प्लांटच्या जवळ असलेल्या बीड जांभरूळ वस्तीतील जवळपास १५० आदिवासी कुटुंबांना धान्य देण्यात आले आहे. याशिवाय प्लांटमधील स्वयंसेवकांनी आतापर्यंत जवळपास २६०० मास्क्सचे देखील वाटप केले आहे. हे मास्क्स क्लबच्या २२ सदस्यांनी तयार केले आहेत.
वरील मदतकार्याच्या बरोबरीनेच आशा, एएनएम आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खालापूरच्या तहसीलदारांकडे मास्क्स सुपूर्द करण्यात आले आहेत. खालापूर तालुक्यातील देवन्हावे ग्राम पंचायतीच्या चार स्वयंसहायता गटांना टाटा स्टील बीएसएल कंपनीच्या सीएसआर विभागाने मास्क्स बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. पहिल्या टप्प्यात ५००० मास्क्स बनवण्याचे त्यांचे उद्धिष्ट आहे. या गटांनी याआधीच ११०० मास्क्स वितरित केले आहेत.
महिला सक्षमीकरण आणि उद्यमशीलतेसाठी समन्वयाचे कार्य करणाऱ्या कंपनीच्या सीएसआर टीमच्या स्थानिक मदतनीस किंवा महिला प्रवर्तक या देखील स्थानिक पंचायतींना दररोजच्या धान्य वितरणामध्ये मदत करत आहेत. चेहऱ्यावर मास्क्स लावणे आणि सॅनिटायझर वापराबाबत लोकांना जागरूक करण्याचे आणि हात योग्य प्रकारे कसे धुवावेत, इतर व्यक्तींपासून दूर कसे राहावे, मास्क्सचा वापर इत्यादी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करत आहेत.
Comments
Post a Comment