प्रवेश बंदीमध्ये घुसणाऱ्या रिक्षा चालकावर पनवेल शहर पोलीसांची धडक कारवाई ..नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज
पनवेल : राज भंडारी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीचे कारण देत नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करीत असल्याचे विदारक सत्य समोर असल्यामुळे ही गर्दी पांगविण्यासाठी पर्यायाने कमी करण्यासाठी उरण नाका परिसरालगतच्या रस्त्यांना एकमार्गी (वन वे) चे स्वरूप देण्यात आले आहे. मात्र काही आडमुठ्या प्रकाराची मानसिकता असलेल्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला सहकार्य मिळत नसल्याचे हॉटेल पंचरत्न येथील चौकात समोर आले आहे.
उरण नाका येथून टपाल नाका आणि तेथून बाहेर पाडण्यासाठी हॉटेल पंचरत्न येथील चौक अशी मार्गिका पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आखलेली आहे. यावेळी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी वाहन फिरविण्याचा सूचना दिल्या असतानाही मी इथूनच जाणार असा अट्टाहास या रिक्षाचालकाने करून गोंधळ माजविला. यावेळी कर्तव्यावर असणारे पोलीस हवालदार किरण सोनावणे यांच्याशी उद्धट वर्तन करून या रिक्षाचालकाने पोलिसांनाही न जुमानता विरुद्ध दिशेने आपली रिक्षा क्रमांक (एमएच ४६ एसी ७७०७) ही पोलिसांच्या समक्षच पळविली. यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग केला. यावेळी मुसलमान नाका येथेही बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो थांबला नाही. व पुढे जाऊन रिक्षा जागीच थांबवून त्याने मोहल्ल्यातील गल्लीमध्ये पळ काढला.
यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सदर रिक्षा पोलीस ठाण्यात नेवून जमा केली असून संबंधित रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ऑनलाईन प्रणालीवर रिक्षाचा क्रमांक टाकून पहिला असता रफिक खामकर या नावावर सदर वाहन असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. यावेळी पनवेल शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, आपले पोलीस बांधव आपल्या चांगल्यासाठीच रस्त्यावर उन्हातान्हात उभे राहून काम करीत आहेत, त्यांना सहकार्य करा. मात्र यामध्ये खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई केलीच जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
Comments
Post a Comment