रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणने पकडलेल्या चालकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह
संपर्कात आलेल्या पोलिसांना केले क्वारंटाईन
लॉकडाऊनमध्ये वरळी येथील कुटुंबाला कारने आणले होते श्रीवर्धनमध्ये
रायगड पोलीस दलात खळबळ; रायगडकरांची चिंता वाढली
अलिबाग । लॉक डाऊन असताना वरळी येथील कुटुंबाला कारने श्रीवर्धनमध्ये घेऊन आलेल्या चालकाला अटक करायला गेलेल्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. अटक केलेल्या वाहनचालकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असून, त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन केल्याची माहिती पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली आहे.
श्रीवर्धनमध्ये भोस्ते गावात कोरोना पॉझिटीव्ह सापडलेले पाच जणांचे कुटुंब हे लॉक डाऊन असताना एका कारने वरळीहून श्रीवर्धनमध्ये आले होते. त्यामुळे दक्षिण रायगडात खळबळ उडाली होती. तसेच लॉकडाऊन असताना हे लोक कारने आलेच कसे? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. प्रशासकीय यंत्रणेलाही ही बाब काळजीत टाकणारी होती.
या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक जमीन शेख यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकावर या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी देण्यात आली. या पथकाने तपास करुन मुंबईतील गोरेगाव येथून संबंधित कारचालकाला ताब्यात घेतले. या चालकाने जवळजवळ 48 लोकांना मुंबई येथून रायगडला आणून सोडले होते. या चालकावर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र या चालकाला अटक करायला गेलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेले रायगड पोलीस दलातील कर्मचार्यांवर आता क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. कारण पकडलेल्या या कारचालकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती पनवेलचे प्रांतअधिकारी दत्तात्रय नवले यांनी ‘रायगड मत’ला दिली आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले असून, पाच दिवसांची त्यांची टेस्ट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकंदरीत, श्रीवर्धनच्या या प्रकरणामुळे रायगड पोलीस दलासह रायगडकरांची चिंता वाढली असून, हे प्रकरण आता कुठवर पोहोचते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment