खारघरच्या घरकुलला पोलिसांचा वेढा ! ....वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी घराबाहेर पडणाऱ्यांना घातला लगाम
खारघर: महापालिकेने कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केलेल्या खारघर सेक्टर 15 मधील विस्तीर्ण पसरलेल्या घरकुल सोसायटीतील रहिवाशांचा लगाम ओढत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी तिकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. मोकाट फिरणाऱ्यांसाठी तिसरा डोळा उघडून पाच पोलिसांची नियुक्तही केली आहे.
घरकुल सोसायटीमधील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तो परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्या परिसराला सील करण्यात आले. खबरदारी घेत फवारणीही केली. परंतु, तेथील नागरिकांनी लॉकडाउन आणि महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुत्रे फिरवण्यापासून ते मोटरगाडीने फेरफटका मारण्याची स्पर्धा सुरू ठेवली होती.
याबाबत पनवेल संघर्ष समितीकडे खारघरच्या काही जागृत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. ती कैफियत समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी तिदार यांच्याकडे मांडली. पण त्यापूर्वीच तिदार यांनी घरकुलकडे जाणारे रस्ते सील केले आहेत. सोसयटीचा परिसर विस्तीर्ण पसरलेला असल्याने तिथे सहज बाहेर पडताना गाडी घेऊनच नागरिक जात आहेत. त्यांना आवर घालून सगळीकडे बॅरिगेट्स लावले आहेत. त्याशिवाय पाच पोलिस कर्मचारी तिकडे तैनात ठेवले असल्याची माहिती तिदार यांनी कडू यांना दिली.
घरकुल आणि खारघर परिसरात गाडी फिरवत असताना कुणी आढळले आणि सहपोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले तर वाहन जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खारघरकरांनी स्वतःला आवर न घातल्यास गाठ पोलिसांशी आहे, हे लक्षात ठेवायला हवे.
Comments
Post a Comment