लॉकडाऊनचे जनतेने गांभीर्याने पालन करणे आवश्यक -- -- पालकमंत्री कु.आदिती तटकरे
अलिबाग, जि.रायगड,दि.15 (जिमाका) : केंद्र आणि राज्य शासन जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाकरिता लॉकडाऊनचा निर्णय राबवीत आहे. मात्र जनतेनेही संयम ठेवून या लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
रायगड जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यासंबंधीची बैठक पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, पनवेल महानगरपालिका महापौर कविता चौतमल,आमदार बाळाराम पाटील,आमदार प्रशांत ठाकूर,प्रितम म्हात्रे, परेश ठाकूर, सतीश पाटील, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त संजय शिंदे, जमीर लेंगरे, सहाय्यक आयुक्त श्याम पोष्टी, श्रीमती तेजस्विनी गलांडे, तहसिलदार अमित सानप, अभिजित खोले, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय पनवेल, डॉ.नागनाथ यमपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र इटकरे हे उपस्थित होते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, रायगड जिल्ह्यातील नागरिक करोना विषाणूच्या प्रादूर्भावापासून सुरक्षित राहावेत,यासाठी शासन, प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र नागरिकांनी गांभीर्याने शासनाच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करायला हवे.
या बैठकीत यापुढे करोना संशय व्यक्तींचे स्वॅप घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्याचे नियोजन करावे. तपासणीसाठी खाजगी लॅबची संख्या वाढवावी कंटेनमेंट क्षेत्रातील करोना बाधित क्षेत्रातील सर्वच नागरिकांची वैद्यकीय तपासणी करावी, अशा बाधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक नियम अधिक काटेकोरपणे पाळण्यात यावेत, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. वसाहतींमधील इमारतींमधील हालचालींवर निर्बंध लावण्यात यावेत जिल्हा प्रशासनाकडून मान्यता मिळालेल्या दुकानदारांना अत्यावश्यक वस्तू विक्रेत्यांनाच नागरिकांकडे अन्नधान्य औषधे इत्यादी अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी पाठवावे याचे स्वतंत्र नियोजन तयार करावे सर्वांनी त्यांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर कटाक्षाने करावा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, स्वच्छता ठेवावी याविषयी अधिकाधिक जागरूकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत. तसेच विशेष म्हणजे करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची, पोलीस कर्मचाऱ्यांची, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे नियोजन करावे. या टास्क फोर्स मधील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे.जे. हॉस्पिटलचे जन औषध वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ.ललित संख्ये आणि डॉ.छाया राजगुरू यांच्या मार्गदर्शनाने वैद्यकीय व्यवस्थापन करावे, या विषयांवर चर्चा झाली आणि लवकरात लवकर या सर्व बाबींचे नियोजन करून त्या तात्काळ अंमलात आणण्याचे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय रायगड जिल्ह्यातील जे लोक लॉकडाऊनच्या कालावधीत शासकीय निवारागृहांमध्ये थांबलेले आहेत,त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यापैकी रायगड जिल्ह्याच्या विविध ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असेही या बैठकीत ठरले. मात्र इतर राज्यातील नागरिकांना या निवारागृहातच थांबविण्यात यावे, असे निश्चित झाले.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी पोलिस प्रशासनाला सूचना केल्या की, त्यांनी रायगड जिल्ह्याच्या सर्व बाजूंच्या सीमेवरच अत्यंत कडक लक्ष ठेवून बाहेरील लोक जिल्ह्यात येणारच नाहीत,यासाठी दक्ष राहावे. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातही लॉकडाऊनची कार्यवाही अत्यंत कटाक्षाने पाडावी. त्यांच्या कार्यक्षेत्रातून रायगड जिल्ह्याकडे नागरिक येणारच नाहीत,याकडे बारकाईने लक्ष देण्याविषयीचे निर्देश देण्याचे निश्चित केले. तसेच Containment Zone (बाधित क्षेत्रांमध्ये) बाबतीत सर्व नियमांची अंमलबजावणी कटाक्षाने व कठोरपणे होण्यासाठी प्रशासनाने आणि नागरिकांनीही कंबर कसली पाहिजे, असेही ते म्हणाले.
बैठकीच्या सुरुवातीस पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात करोना विषाणू प्रतिबंधात्मक राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा सादर केला.
प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी जिल्ह्यात प्रशासनाने काय काय खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, याविषयीची माहिती दिली तर पोलीस उपायुक्त श्री.अशोक दुधे यांनी पोलिस प्रशासनाकडून लॉकडाऊन काळात कोणती कार्यवाही करण्यात येत आहे,याविषयीची माहिती दिली.
ग्रँट मेडिकल कॉलेज व जे जे रुग्णालयाचे प्रा.डॉ. ललित संख्ये आणि प्रा.डॉ.छाया राजगुरू यांनीही बाधित क्षेत्रातील सर्वच हालचालींवर नियंत्रण आणण्याविषयी सूचित केले.
Comments
Post a Comment