शहर वाहतूक शाखेचे घरीच बसण्याचे नागरिकांना आवाहन
पनवेल शहर वाहतुक पोलिसांचा
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
अवघ्या १७ दिवसात केल्या २२५० जणांवर कारवाया
बुधवारी सायंकाळी ५ ते ९ यावेळेत २८८ कारवाया
शहर वाहतूक शाखेचे घरीच बसण्याचे नागरिकांना आवाहन
पनवेल : राज भंडारी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करीत असून नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र नागरिकांची मानसिकता प्रशासनाच्या नाकी दम आणत आहे, त्यातच पोलिसांचे शासनाने हात बांधून ठेवले असल्यामुळे पोलीस प्रशासनामार्फत होणारी किरकोळ कारवाई नागरिकांना घरी बसण्यास समर्थन देणारी नाही. मात्र अशा परिस्थितीतही पनवेल शहर पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात नागरिकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना घरी बसण्यासाठी भाग पाडले आहे. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात अवघ्या १७ दिवसात पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने तब्बल २२५० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून बुधवारपासून सायंकाळी ५ नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तब्बल २८८ वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई करीत त्यांना घरी बसविण्यासाठी धडा शिकविला आहे.
दिनांक २३ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना विनाकारण घरातून बाहेर न पाडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची सिंघम कारवाई सुरु झाली होती. मात्र यावेळी ना. छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तांनी या कारवाईला थंड करण्याचे आदेश देऊन वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनीही आपली धडक कामगिरी बजावत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी दिनांक २३ मार्च ते ०८ एप्रिल 2020 पर्यंत एकूण २२५० केसेस करण्यात आल्या असून यामध्ये १३७ तडजोड कारवायांमध्ये तब्बल ५९ हजार ७०० रुपये महसूल शासनाला मिळवून दिला आहे. यामध्येही झालेल्या कारवाईत दुचाकीवरील एकूण केसेस १७७४, हेल्मेट परिधान न करण्याऱ्यांच्या एकूण केसेस ७५१ असून त्यामध्ये २७ हजार रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.
यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे बुधवार दिनांक ०८ एप्रिलपासून महाराष्ट्रात सायंकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत वैद्यकीय सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जरी करण्यात आले,तसेच यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार स्थानिक पोलीस प्रशासनासह वाहतूक पोलिसही जोमाने कामाला लागले आणि अवघ्या ४ तासात पनवेल शहर वाहतूक पोलीसांच्यामार्फत २८८ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर या कारवाया करण्यात आल्या. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून धास्ती निर्माण झालेल्या नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळण्यासाठी आता पोलीस प्रशासनामार्फतही युक्त्या लढविल्या जात आहेत.
कोट
देश संकटात असल्यामुळे अत्यावश्यक सेवा सुरळीत राहून आणि आपण घरी राहून देशसेवा करण्याची प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, मात्र याला काही नागरिक अपवाद ठरत आहेत. त्यामुळे देशामध्ये लॉक डाऊनचे नागरिकांनी तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. या अशा काळात कारवाई करणे ही आमची जबाबदारी नसून केवळ देशहितासाठी नागरिकांनी घरात बसण्याची गरज आहे, आणि यामध्ये देशहिताचा विचार न करता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना शासन करावे लागत आहे.
- अभिजित मोहिते, पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा
Comments
Post a Comment