म्हसळा - बेकायदेशीररित्या मारुती सुझुकी गाडीतून दोन लाखांच्या आंब्यांच्या पेट्या म्हसळ्यातून कर्जतमध्ये नेणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करून लाखांचा माल व मारुती सुझुकी व्हॅन जप्त

 



 


 


 


म्हसळा । लॉकडाऊनच्या काळात बेकायदेशीररित्या मारुती सुझुकी गाडीतून दोन लाखांच्या आंब्यांच्या पेट्या म्हसळ्यातून कर्जतमध्ये नेणार्‍या म्हसळ्यातील कोळवट ग्रामपंचायत कोरोना संसर्ग नियंत्रण पथकातील सरकारी कर्मचार्‍याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन लाखांचा माल व मारुती सुझुकी व्हॅन जप्त केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, संचारबंदी आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व खबरदारी म्हणून गावागावात कोरोना संसर्ग नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाद्वारे कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका असे सरकारी व निमसरकारी कर्मचारी महत्वाची भूमिका बजावत आहेत. असे असताना म्हसळा तालुक्यातील एका शिक्षकाने लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीर काम केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
म्हसळा तालुक्यातील पाष्टी केंद्रांतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापट या शाळेतील उपशिक्षक आणि कोळवट ग्रामपंचायतीच्या कोरोना संसर्ग नियंत्रण पथकातील सदस्य अजय सोपान केंद्रे (सध्या रा. म्हसळा मूळ रा. कर्जत नानामास्तर मुद्रे, कर्जत) लॉकडाऊनच्या या काळात मारुती सुझुकी गाडीतून दोन लाखांच्या आंब्यांच्या पेट्या बेकायदेशीररित्या म्हसळा ते कर्जत घेऊन गेले. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोन लाखांचा माल व एक मारुती सुझुकी व्हॅन जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 एप्रिल रोजी अजय केंद्रे या शिक्षकाने सध्या महाराष्ट्र व रायगड जिल्ह्यात कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव सुरु असताना, नागरिकांच्या जीवितास धोकादायक असलेला संसर्ग पसरण्याची हयगयची कृती केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सरकारी नोकर असताना त्यास जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग यांनी दिलेले संचारबंदीचे आदेश माहित असूनही त्याची अवज्ञा करत, बेकायदेशीररित्या आंब्याच्या पेट्या घेऊन म्हसळा ते कर्जत असा प्रवास केला असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम 188, 269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत येथील पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून कार्यालयाला काहीही न कळवता तालुक्यातील बरेच शिक्षक आपापल्या गावी गेले आहेत. त्याचीही चौकशी गटशिक्षणाधिकारी यांनी करण्याची मागणीही करण्यात केली जात आहे.


हे शिक्षक गेलेच कसे?


शिक्षक अजय केंद्रे हे कोरोना पथकप्रमुख, पाष्टी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच गावी गेले. सरकारी कर्मचार्‍यांनी मुख्यालय सोडून न जाण्याचे शासनाचे आदेश असताना हे शिक्षक गेलेच कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.


कारवाईकडे शासकीय कर्मचार्‍यांचे लक्ष


त्याचबरोबर अशाप्रकारे बेकायदेशीर काम व साथ रोग काळात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शिक्षकावर शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व तालुक्याचे तहसीलदार कोणती कारवाई करतात? याकडे सर्व शासकीय कर्मचार्‍यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.


शिक्षण विभागाकडून कोणतीच कारवाई नाही


ही घटना 22 एप्रिलला घडली असून त्याच दिवशी शिक्षकावर गुन्हा नोंद झाला आहे. असे असताना म्हसळा प्रशासन तसेच शिक्षण विभागाने या शिक्षकावर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई का केली नाही? हा प्रश्न निर्माण आहे. वरिष्ठ अधिकारीच अशा शिक्षकांना पाठीशी घालत आहेत की काय? असा प्रश्‍न निर्माण केला जात आहे.


राजिप भापट शाळेत कार्यरत असलेले उपशिक्षक अजय केंद्रे हे ग्रामपंचायत कोळवट कोरोना सनियंत्रण पथकाचे सदस्य आहेत. ते वेळापत्रकानुसार 19 एप्रिलला ड्युटीवर हजर होते. त्यानंतर 22 एप्रिललाही त्यांची ड्युटी होती; पण ते त्यादिवशी गैरहजर होते. 27 एप्रिल रोजीही ड्युटी असताना ते गैरहजर होते. तसा रिपोर्ट तहसीलदार व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना सादर केला आहे. मी त्यांना स्वतः फोन केला होता, मात्र त्यांनी उचलला नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला तर त्यालाही रिप्लाय दिलेला नाही.
– नितीन माळीपरगे (मुख्याध्यापक)
प्रमुख, कोरोना संसर्ग नियंत्रण पथक
कोळवट ग्रामपंचायत


शिक्षक अजय केंद्रे यांनी केलेल्या कृतीबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु त्या पोलीस ठाण्यातून आमच्या कार्यालयाला लेखी स्वरूपात कोणतीही माहिती आली नाही. याबाबत मी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना कळविले आहे. ते शासकीय नियमानुसार त्यांच्यावर काय कारवाई करायची आहे ती करतील.
– संतोष शेडगे,
गटशिक्षणाधिकारी, म्हसळा


शिक्षक अजय केंद्रे याने केलेल्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.
– वाय.एम.प्रभे,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती-म्हसळा


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर