तळोजामध्ये गरजूंना शिवभोजनच्या माध्यमातून मोफत अन्नदान शिवसेना जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
पनवेल : राज भंडारी
कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव पाहता केंद्र शासनासह राज्य सरकारने लॉक डाऊनचा कालावधी वाढविला आहे. पर्यायाने हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांची मात्र यामुळे उपासमार होताना दिसून येत आहे. एका बाजूला रेशनकार्ड धारकांना सरकार रेशन उपलब्ध करून देत आहे तर ज्यांची रेशन कार्डच परराज्यातील अथवा परगावातील आहेत, अशा गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी तळोजा परिसरातील गरजूंना अन्नधान्य देण्याची धुरा पार पाडल्यानंतर गेल्या १६ दिवसांपासून ते येथील ७०० ते ८०० गरजूंपर्यंत शिजविलेले अन्न शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे.
यावेळी तळोजा येथील शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील यांच्या बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार उडविला असून जागतिक पातळीवरील अमेरिका, ब्रिटन, फ्रांस आदी देशांमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. गेल्या दीड महिन्यापासून भारतातही या विषाणूने डोके वर काढले असून संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा १४ हजारांच्या आसपास गेला आहे, तर महाराष्ट्रात हा आकडा ३३०० च्या आसपास गेला आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील एकट्या मुंबईमध्ये पाहावयास मिळत असून त्याचे पडसाद जवळपासच्या शहरांवरही होत आहे. आज पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. यावेळी लोक डाऊनचे ९८ टक्के नागरीक तंतोतंत पालन करताना दिसून येत आहेत. मात्र केवळ २ टक्के नागरिकांनी लोक डाउनच्या काळातही बाहेर फिरण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे अशा लोकांना पोलिसांनी दांडक्याने अद्दल घडविली पाहिजे.
गेले महिनाभर कोरोना रोगावर मात करण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत असून यासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले. मात्र यावेळी मोठी अडचण निर्माण झाली आहे ती गोरगरीब जनतेची. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राची धुरा हाती घेऊन उत्तम असे नियोजन सुरु केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बाळासाहेबांचे सैनिक म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या १६ दिवसांपासून येथील गोरगरिब जनतेला शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मोफत सुरु केलेले शिजविलेले अन्न लॉक डाउनच्या अखेरच्या तारखेपर्यंत राहणार असल्याचेही यावेळी जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी बोलताना सांगितले. तसेच सर्वच नागरिकांना त्यांनी लॉक डाऊनचे पालन करून घरीच राहा आणि सुरक्षित राहा असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment