जनहित याचिकेमुळे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी
उरण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश.
आता अपघातग्रस्तांचे वाचणार जीव.
जनहित याचिकेमुळे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढी
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे)उरणमधील अपघात व त्यासंदर्भातील होत नसलेल्या उपाययोजना या संदर्भात उरण सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी सध्या मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटिल आणि न्यायमूर्ती एन एम जमादार यांच्या खंडपीठा समोर नियमितपणे सुरु आहे. JNPT परिसरात होणारे अपघाताचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालयाने राज्य सरकार आणि JNPT प्रशासनास रक्तपेढी आणि ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे आदेश दिले होते.त्याचमुळे 15 एप्रिल 2019 पासून उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवणुक केंद्र स्थापन करण्यात आले असून ते जनतेच्या सोयीसाठी तातडीने कार्यान्वयित करण्यात आले आहे. अपघात संदर्भातील उपाययोजना संदर्भात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येताच याचिका कर्त्यांचे वकील ऍड. प्रियांका सुरेश ठाकुर यांनी न्यायालय आणि राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकेणी यांच्यासमोर युक्तिवाद करताना वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यात रक्तपेढी आणि ट्रामा केअर सेंटर तातडीने उभारण्याची निकड विशद केली.त्याचमुळे सध्या रक्त साठवणुक केंद्र उरण मध्ये सुरु झाले आहे. JNPT तर्फे येत्या 1 ते दिड महिन्यात ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे आणि त्यानुसार न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर झाल्याची माहिती ऍड. प्रियांका ठाकुर यांनी दिली. या सुविधामुळे अपघातग्रस्तांना 'गोल्डन हवर्स ' मध्ये तातडीने उपचार मिळून याचा फायदा अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशा नुसारच मागील दोन महीन्या पासून उरण-पनवेल-नवी मुंबई रस्त्यावर तीन एम्बुलेन्स आणि JNPT रुग्णालयात अतिरिक्त एम्बुलेन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रस्ते अपघात आणि वाहतुक कोंडी निवारण्यासाठी दहा वाहतुक पोलिस, तीन पोलिस चौक्या, दोन गस्त वाहने आणि JNPT तर्फे 25 वॉर्डन्स नेमन्यात येणार असल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल यांनी दिली.याचिकेतील प्रत्येक मागणीवर आणि सिडको, JNPT, NHOI, राज्य सरकार यांच्याकडून होत असलेल्या कारवाईवर उच्च न्यायालय लक्ष ठेवून असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशांची योग्य अंमलबजावणी होत आहे. उरण तालुक्यातील जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने खंबीर निर्णय घेतल्यामुळे आणि न्यायालयासमोर समस्यांची अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी केल्याच्या पार्श्वभूमीवर ऍड. प्रियांका ठाकुर आणि उरण सामाजिक संस्थेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment